(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाषेचे महत्व असून त्याद्वारे आपल्या सुख- दुःखाच्या भावना व्यक्त होत असतात. त्यामुळे भाषा हे व्यक्त होण्याचे प्रभावी साधन असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले. ते कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज जयंती तथा मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात मराठी भाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, कोकण मराठी साहित्य परिषद आणि कविता स्मारक व्यवस्थापन समितीच्या वतीने मालगुंड या ठिकाणी भव्य स्मारक आणि वाचनालय उभारले असून या वाचनालयाचा उपयोग मालगुंड व मालगुंड परिसरातील विद्यार्थी, ग्रामस्थ, पालकांनी यांनी केला पाहिजे. जेणेकरून आपल्या प्रत्येकाने वाचनाची संस्कृती जोपासली पाहिजे. कारण वाचनाने समृद्ध माणसे, नागरिक घडत असतात, त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावेत असाही आशावाद व्यक्त करत, कोकण मराठी साहित्य परिषद व व्यवस्थापन समितीला अशा उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रज आणि कवी केशवसुत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्प, पेन व ग्रंथभेट देऊन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केशवसुत स्मारक प्रकल्पाची माहिती देत, स्मारकाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. शासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन हा अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि उज्वल स्वरूपामध्ये साजरा झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर कार्यक्रमाला उपस्थित असणारे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर यांनीही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इंग्रजी शिक्षणापेक्षा मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे आणि मातृभाषेच्या शिक्षणावर सर्वांनी भर देणे आवश्यक असल्याचे मत मांडले. तर याप्रसंगी कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषा या विषयावर मार्गदर्शन करताना माजी प्राध्यापक हनुमंत कदम यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातून समाजमन प्रकट होत असल्याची माहिती देताना मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास सांगितला.
या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी संस्कृतीवर आधारित मालगुंड परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आणि विविध सांस्कृतिक मंडळांनी पोवाडा, ओव्या, गोंधळ, आदिवासी नृत्य, शेतकरी नृत्य हे व असे विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, मालगुंड ग्रामपंचायत उपसरपंच संतोष चौघुले, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार, जिल्हा नियोजन सदस्य प्रकाश साळवी, सामाजिक कार्यकर्ते शेखर खेऊर, ग्रामपंचायत सदस्य सन्मान मयेकर, संचालक श्रीकांत मेहेंदळे, गणपतीपुळे बीटचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पत्रकार वैभव पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालगुंड कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील,कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, अरुण मोर्ये, रवींद्र मेहेंदळे, रामानंद लिमये, अमेय धोपटकर यांच्यासह स्मारक व्यवस्थापन समितीचे स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, पवार मॅडम, अस्मिता दुर्गवळी यांनी विशेष प्रयत्न केले.