(संगमेश्वर / एजाज पटेल)
प्रतिस्पर्ध्याचे दोन-चार गडी टिपायचेच, या ईर्षेने आतमध्ये घुसून केलेल्या आक्रमक चढाया, टच लाईन ओलांडू पाहणाऱ्याला सोडायचे नाही, या पवित्र्याने केलेल्या अफलातून पकडी अन् डाव्या, उजव्या कोपऱ्यातून वेळीच जोरदार येणारी कव्हर कुमक, काही क्षणांमध्ये घडणाऱ्या या सर्व घडामोडी श्वास रोखून धरायला लावत होत्या. लाल मातीही थरारून जात होती. निमित्त होते पोलीस “रायझिंग डे” संगमेश्वर पोलीस ठाणे येथे आयोजित कबड्डी स्पर्धेचे. या स्पर्धेत तालुक्यातून आलेल्या संघातील खेळाडूंनी दम दाखवला.
रायझिंग डे चे औचित्य साधत संगमेश्वर पोलीस ठाणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डे, नाईट कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेते पदाचा मानकरी संघ ठरला. जय भवानी कुंभारखाणी तर यजमान महापुरुष पोलीस संगमेश्वर संघाने उपविजेता पदाला गवसणी घातली. तालुक्यातील एकूण दहा संघानी स्पर्धेत भाग घेतला.संगमेश्वर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रा अंततर्गत येणाऱ्या गावामधील पोलीस पाटील तसेच पोलीस ठाण्यातील सर्व पुरुष तसेच महिला पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा हजारो प्रेक्षकांच्या उवस्थितीत पार पाडली.
अंतिम सामन्यात एन्ट्री मारलेल्या जय भवानी कुंभारखाणी तसेच महापुरुष पोलीस संघ संगमेश्वर यांचा येथील लाल मातीच्या मैदानावर कबड्डीतील दम आणि थरार पहायला मिळाला. बलाढ्य अशा दोन्ही संघाच्या लढतीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या जय भवानी कुंभारखाणी संघाने 32 गुण स्वतःच्या पारड्यात पाडून प्रतिस्पर्धी महापुरुष पोलीस संघाला 14 गुणांवर समाधान माणण्यास भाग पाडून अजिंक्यपद पटकावले. हार-जीत ही असतेच पण जिंकण्यासाठी दिलेली झुंज महत्वाची असते. दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडू मैदानावर तशी झुंज देताना दिसत होता. मात्र महापुरुष पोलीस संघाला त्यात यश न आल्याने उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले.
प्रथम क्रमांकाच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या जय भवानी कुंभारखाणी संघाला तसेच उपविजेता ठरलेल्या महापुरुष संगमेश्वर पोलीस संघाला पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट पकड म्हणून महापुरुष पोलीस संघाच्या रेवनाथ सोडमिसे, जय भवानी संघाच्या कुणाल कदम याला उत्कृष्ट चढाई तर तुळशीदास शिर्के याला उत्कृष्ट खेळाडू म्हणुन मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
तालुक्याचे कबड्डी प्रेम पाहून मन आंनदीत झाल्याचे सांगत संगमेश्वर तालुका हा शांततामय व संयमी तालुका असल्याचे सांगतानाच येथील पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारी तालुक्यातील जनता आहे. रायझिंग डे निमित्त आयोजित या कार्यक्रमातून पोलीस आणि जनतेचे नाते दृढ होत असल्याचे कौतुक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धंनजय कुलकर्णी यांनी केले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन मिलिंद शिंदे, विनोद करंडे, संतोष कदम, गणेश कदम यांनी केले तर पंच म्हणुन उमेश सावंत, सतीश पवार, अजित मोहिते, विश्वास खाके, संदेश शिवलकर, सतीश फटकरे, संजय गेल्ये, सुयश राळे यांनी उत्तम प्रकारे केले.