(रत्नागिरी)
गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मात्र तिकीट बुकिंग सुरू होताच 8 मिनिटातच कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांची सगळी तिकिटं संपली आहे. त्यामुळे प्रवाशांचा पुन्हा हिरमोड झाला आहे.
गणपती स्पेशल 202 गाड्यांच्या तिकीटाची विक्री अवघ्या 8 मिनिटातच झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यातच गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होतो, याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याची टीका कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
प्रत्येक वर्षी तिकिटाचा काळाबाजार समोर येत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होतात. इतके आधुनिक तंत्रज्ञान असतानाही काळाबाजार होत आहे, ही चिंताजनक गोष्ट आहे. आरक्षण सुरू होताच पहिल्या आठ ते दहा मिनिटांतच आरक्षण फुल झाले, यामुळे तिकीट आरक्षणात पुन्हा एकदा काळाबाजार सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी कोकण अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष श्री शौकत मुकादम यांनी केली आहे. संसदेमध्ये खासदार सुनील तटकरे यांना यासंबंधी आवाज उठवण्याची विनंती करणार असल्याचे मुकादम यांनी सांगितले.