( रत्नागिरी )
कोकणात लेखन वाचन, संस्कृती वाढावी यासाठी कोमसापने चळवळ सुरु केली. यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पुरस्कार देतो. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी खूप उच्च दर्जाची पुस्तके पुरस्कारासाठी आली होती. त्यातून पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष नमिता किर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात अग्रगण्य असणार्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारे सन 2022-23 चे वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यावेळी गजानन पाटील, प्रकाश दळवी, नलिनी खेर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नमिता कीर पुढे म्हणाल्या की, वेगवेगळ्या साहित्य मंडळांवर कोमसापच्या सदस्यांची निवड झाली आहे. मराठी विश्वकोश मंडळावर माझी आणि वृंदा कांबळींची निवड झाली आहे. कोमसापची व्याप्ती आता राज्यभर वाढत आहे. कोमसापच्या कामाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. आम्ही युवाशक्तीच्या माध्यमातून तरुणांना साहित्य क्षेत्रात सक्रिय करत आहोत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात सर्व साहित्यिक व साहित्य संस्थांचा सहभाग आहे. २४ जून २०१९ ला मधूमंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २६ साहित्य संस्थांनी एकत्र येऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आंदोलन केले होते. त्याला यश मिळाले आहे.
ताराताई भवाळकर यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. त्या कोमसाप परिवारात परिवारातील आहेत. पालघर येथे २००५ साली झाले महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. असे नमिता कीर यांनी सांगितले.
सन 2022-23 मधील सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.