(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठ्यातील विहिरीचे पाणी सध्या दूषित होत असल्याने संबंधित व्यावसायिकांकडून तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, मागील काही महिन्यापूर्वी गणपतीपुळे येथील आपटातिठा ते कोल्हटकर तिठा या मुख्य मार्गालगत गटार लाईनचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. परंतु याच गटारामध्ये गणपतीपुळे येथील आपटातिठा ते कोल्हटकर तिठा परिसरातील काही हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या सांडपाण्याची पाईपलाईन जोडली आहे. मात्र या पाईपलाईनचे पाईप सध्या निसटल्याने पाईपलाईनमधील सांडपाणी नजीकच्या विहिरीमध्ये जात असल्याचे पत्र ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून राहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या गटाराच्या नजीकच अतिथी नावाचे हॉटेल असल्याने या ठिकाणी दररोज नाश्ता व जेवणासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र सध्या हॉटेलच्या शेजारीच गटारातील सांडपाणी साचत असल्याने सांडपाण्याच्या दुर्गंधीचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. याचा फटका संबंधित हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. त्याचबरोबर संबंधित व्यावसायिकाच्या विहिरीचे पाणीही मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे.
या ठिकाणी असलेल्या विहिरींचे पाणी स्थानिक हॉटेल व्यवसायिक आपल्या कुटुंबांसाठी आणि पर्यटकांसाठी करतात, मात्र सध्या पाणी दूषित होत असल्याने संबंधित व्यवसायिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित व्यावसायिकानी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र बरेच दिवस होऊनही याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून अद्याप कुठलीही कारवाई केली जात नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकूणच पर्यटक व स्थानिकांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती दखल घेऊन कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.