( रत्नागिरी /प्रतिनिधी )
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. हातखंबा ते खेडशी भागातील रस्त्याची अर्थात सर्विस रोडची वाताहत झाली आहे. रवी इन्फ्रा बिल्ड या ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना चिखलातून दिवस-रात्र धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. याकडे ना शासनाचे लक्ष… ना प्रशासनाचे लक्ष आहे.
रेल्वे स्टेशनपासून ते कारवांचीवाडी पर्यंत केवळ एका बाजूची मार्गीका तुकड्यात पूर्ण झाली आहे. त्यापुढील वाहतूक धोकादायक असलेल्या सर्विस रोडवरून सुरू आहे. संबंधीत ठेकेदार कंपनीने खेडशी येथे काँक्रिटीकरणाच्या एका मार्गिकेचे अर्धवट ठेवलेले काम पूर्ण न करता दुसऱ्या बाजूच्या मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. यातून एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था रवी इन्फ्राबिल्ड या ठेकेदार कंपनीची झालेली आहे. परंतु एका बाजूची मार्गिका एकमार्गी पूर्णत्वास नेल्यास डायवर्जन करावे लागणार नाही. यातून छोटे-मोठे होणारे अपघात देखील टाळता येतील. तसेच चिखलातून धोकादायक सुरू असलेला प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होईल. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी वारंवार दुर्लक्ष करत आहे. सुस्त बसलेले अधिकारी रस्त्यावर अपघात घडण्याची वाट पाहतायत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याच भागात चिखलमिश्रित माती काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर आल्याने रस्ताला घसरगुंडीचे स्वरूप आले आहे. तर हातखंबा तिठ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत तुकड्यात काँक्रिटीकरणाची मार्गिका अर्धवट स्थितीत ठेवण्यात आली आहे. दिवसातून दोन ते तीन दुचाकीस्वार घसरुन अपघात होत आहेत. यासोबत लहान-मोठ्या गाड्यांचे या चीखलमिश्रित व घसरगुंडीचे स्वरूप आलेल्या रस्त्यावरून अर्जट ब्रेक लागत नसल्याचे काही वाहनचालकांकडून सांगण्यात आले आहे.
वाहनचालकांना चिखलातून रस्ता शोधण्याची वेळ
चांदसूर्या ते हातखंबा या परिसरात सर्विस रोडवरील प्रचंड खड्ड्यांनी वाहनचालक हैराण झाले आहेत. लहान वाहनचालकांना चिखलातून रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांची खोली वाढत जात असल्याने रात्रीच्या अंधारात पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर वेळीच उपाययोजना करुन अपघात रोखावेत, अशी वेळोवेळी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत असते. मात्र याकडे कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याला लक्ष देण्यास वेळ नाही असेच काहीसे चित्र आहे.
लोकांच्या व्यथा जाणणारा कोणी लोकप्रतिनिधी नाही….
जनतेशी शासन- प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? हाच मला प्रश्न पडतो. सर्व अधिकाऱ्यांना चारचाकी गाड्या आहेत. अधिकारी चारचाकिमधून फिरतात. मात्र हाल, अपघात सर्वसामान्य माणसाचे होतात. चिखलांच्या दुचाकीवरून अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून प्रवास करून दाखवावा. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ फोटोसेशन न करता हायवेची दुर्दशा पांढऱ्या दिव्याच्या गाडीतून बाहेर येऊन पहावी. लोकांच्या व्यथा जाणणारा लोकप्रतिनिधी आजपर्यंत तयार झालेला नाही त्यामुळे ही स्थिती सामान्य लोकांवर ओढावत आहे. अशी सणसणीत प्रतिक्रिया वाहनचालक मुकुंद सावंत यांनी दिली आहे.