(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील खेडशी ग्रामपंचायतीची यशस्वीपणे धुरा सांभाळणाऱ्या महिला सरपंच जान्हवी घाणेकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. उत्कृष्ठ गावाचा कारभार करणाऱ्या महिला सरपंच यांनी तडकाफडकी राजीनाम्यावरून अनेक प्रश्न चर्चिले जात आहे. परंतु राजीनामा देण्यामागे स्थानिक आमदारांच्या एका जवळच्या व्यक्तीचा हात असल्याचे बोलले जात आहे. परंतु सरपंच यांनी दिलेला राजीनामा हा मागे देखील घेतला. यामुळे आता राजकीय वर्तुळासह सर्वत्र उलट-सुलट चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.
खेडशी ग्रामपंचायतीतमध्ये महिला सरपंच म्हणून जान्हवी घाणेकर यांनी ४ एप्रिल २०२२ रोजी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर एक महिला सरपंच म्हणून घाणेकर या पहिल्यांदाच गावाचा कारभार अगदी उत्कृष्ठपणे सांभाळत असल्याचे चित्र दिसून येत होते. सरपंच पदी चांगले काम करीत असल्याने गावातील अनेकांच्या मनात त्यांच्याबाबत चांगली प्रतिमा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. दोन वर्ष उलटल्यानंतर अंतर्गत पक्षीय राजकारण सुरू झाले. या ग्रामपंचायतीमध्ये आमदाराच्या एका जवळच्याच व्यक्तीने हस्तक्षेप करून राजीनामा देण्यासाठी भाग पाडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. या सर्व बाबींना कंटाळून सरपंच घाणेकर यांनी अखेर २० जून २०२४ रोजी आपला राजीनामा प्रशासक तथा गटविकास अधिकारी जे.पी. जाधव यांच्याकडे सुपूर्द केला.
त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच घाणेकर यांनी दिलेला राजीनामा अर्ज हा सत्यता पडताळणीसाठी दि.२४/०६/२०२४ रोजी ग्रामपंचायतीच्या पुढील मासिक सभेसमोर विषय ठेवण्यासाठी ग्रा.प. खेडशीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे ग्रामसेवक पाल्ये यांच्याकडे पाठवला. दरम्यान सरपंच घाणेकर यांनी सात दिवसांच्या आतमध्ये दिलेला राजीनामा २६ जून रोजी मागे घेतला. सरपंचांनी राजीनामा मागे घेतल्याने अनेकांना आश्चर्यांचा धक्का बसला. गावासह राजकीय वर्तुळात देखील उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा मागे घेण्याचे पत्रक देखील ग्रामसेवक पाले यांना पाठविले. मात्र राजीनामा मागे घेण्याचे पत्रक ग्रामसेवक पाले यांना प्राप्त होऊन देखील १२ जुलै २०२४ रोजीच्या मासिक सभेत सरपंच पद रिक्त झाल्याबाबत विषय मांडला. यावर गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्या पत्रावर थेट एका महिला सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.
ग्रामसेवकांनी वरिष्ठांकडे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, ग्रा.प.सदस्या श्रीमती हर्षदा भिकाजी गावडे यांनी ग्रामसेवक यांना विचारणा केली की, सरपंच पदाच्या राजीनामा पत्रासोबत जसा सरपंच पदाच्या राजीनाम्याचा मूळ अर्ज जोडून पत्र तुमच्याकडे सत्यता पडताळणीसाठी दिलेले आहे. त्याप्रमाणे राजीनामा अर्ज परत घेत असलेल्या पत्रासोबत राजीनामा अर्ज परत घेत असल्याचा सरपंचाचा मुळ अर्जाचे वाचन करावे. त्यावर ग्रामसेवक पाले यांनी सांगितले की, गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच राजीनामा परत घेत असलेल्या पत्रासोबत सरपंच श्रीमती. जान्हवी घाणेकर यांचा मुळ अर्ज नाही. त्यामुळे वाचन करता येत नाही. यावर श्रीमती हर्षदा भिकाजी गावडे यांनी विचारणा केली की, राजीनामा परत घेत असल्याचा मुळ अर्ज नसताना या पत्राचे आधारे राजीनामा मागे घेण्याबाबत कायदयामध्ये काय तरतुद आहे हे ग्रामसेवकांनी स्पष्ट करावे ही बाब ग्राह्य होऊ शकते का? यावर ग्रामसेवक यांनी सांगितले की, ग्रा.पा. नियमाप्रमाणे सरपंचाने दिलेला राजीनामा अर्ज व राजीनामा परत घेत असलेचा अर्ज सभेसमोर आल्यास राजीनामा अर्जावर कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद आहे. यावर श्रीमती हर्षदा भिकाजी गावडे यांनी सांगितले केली की, कायद्यातील तरतुद स्पष्ट आहे. परंतु राजिनामा परत घेतल्याचा अर्जच गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रासोबत नाही. या अर्जाचे सभेत वाचन झाले नसल्याने राजीनामा अर्ज ग्राहय धरता येणार नाही. त्यामुळे सदर राजीनामा अर्जाची पडताळणी सरपंच व संबंधित साक्षिदारांनी राजीनामा अर्जावरील सहया व राजीनामा खरा असल्याचे मान्य केले. तसेच ग्रामसेवकांनी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे.
राजीनामा मागे घेण्याबाबत ग्रामसेवकांना दिले पत्र…
परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा मागे घेण्याबाबत जे ग्रामसेवक यांना पत्रक काढले होते. त्यात स्पष्ट शब्दात म्हटले आहे. की, सरपंच ग्रामपंचायत खेडशी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिनांक 20/6/2024 रोजी घरगुती अडचणीमुळे दिला होता. सदरचा सरपंच राजीनामा अर्ज दिनांक 25/06/2024 रोजी परत घेत असल्याबाबत या कार्यालयास अवगत केले आहे तरी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार नियमउचित कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे. राजीनामा मागे घेण्याचे हे पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक पाले यांना देऊन सुद्धा ग्रामसेवकांनी मासिक सभेसमोर विषय घेतल्याने हे प्रकरण चिघळले आहे.
ग्रामसेवकांच्या निर्णयावरून सरपंच यांचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र…
ग्रामसेवकांनी सरपंच पद रिक्त असल्याबाबत मासिक सभेत ठराव करून तयार केलेला अहवाल तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. तसेच अहवालाची संबधित विभागांना प्रत देखील दिल्या आहेत. ग्रामसेवकांनी दिलेल्या अहवालावर जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूने महिला सरपंच घाणेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत खेडशी यांनी दि.१९/०७/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सरपंच निवडीबाबत दिलेल्या पत्रासंदर्भात एक पत्र दिले आहे. यात म्हटले आहे की, मी राजीनाम्याची नोटीस दिल्यापासून पुढील ७ दिवसांच्या आत राजीनामा मागे घेतला होता. त्यामुळे माझ्या सरपंच पदाबाबत कोणतीही बैठक घेण्याचा अथवा त्याबाबत निर्णय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असे म्हटले आहे. त्यामुळे या दिलेल्या पत्रामुळे हे सर्व प्रकरण आता गटविकास अधिकारी जे पी जाधव यांच्यासह ग्रामसेवकांवरही उलटण्याची शक्यता आहे.