कर्नाटकचा रणसंग्राम जिंकल्यापासून काँग्रेसचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. काँग्रेस आता दक्षिणेतील राज्यातील गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी तेलंगाणातील अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. या पक्षप्रवेशाने मुख्यमंत्री केसीआर व बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. तेलंगाणा राज्यात या वर्षीच्या अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे आणि त्या डोळ्यासमोर ठेऊनबीआरएसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तेलंगणातील भारत राष्ट्र समितीला विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार पी श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह राज्यातील ३५ नेत्यांनी काँग्रेसची सदस्यता घेतली आहे. राज्यातील ३५ नेत्यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगाणा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगाना काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. तेलंगाणा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी २ जुलै रोजी तेलंगाणाच्या दौऱ्यावर येणार आहेत.