(सातारा)
कासपठार सातारा जिल्ह्यात असून 140,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध, जैवविविधता असणारे ठिकाण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतावर वसलेले आहे. कास पठार परिसरात पावसाळी पर्यटन आता बहरू लागले असून कास तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शनिवार, रविवार कासचे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उत्तेश्वर घाटापासून कास पठार, कास तलावापर्यंत पर्यटकांच्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे. कास, बामणोली परिसरात अधून मधून रिमझिम पडणारा पाऊस यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ओढे व झरे वाहू लागले आहेत. कास पुष्प पठार, कास तलाव या परिसरात देखील अधून मधून पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे.
सुट्टीचा आनंद निसर्ग अनुभवून पर्यटक घेत आहेत. अनेकजण प्रोफेशनल फोटोग्राफीही करत आहेत. अनेक पर्यटकांनी कास व परिसरातील निसर्गाची भ्रमंती करत येथील विविध प्रकारच्या झाडांचेही अवलोकन करत आहेत. गेंद, भुई कारवी, चवर, वायुतुरा (सातारी तुरा), पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता (हलुडा) अशी रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. पर्यटकांना कास पठारावर आढळणार्या ‘एकमेवाद्वितीय’ फुलांचा नजारा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आता कासचे वेध लागले आहेत. कासपठार फुलल्यामुळे पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कास पठाराच्या नावामागे दोन कथा आहेत. आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून आज कासपठार हे नाव पडले. अशी एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की ‘कासा’ चा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पडले आहे. हे सुंदर ठिकाण एका टेकडीच्या माथ्यावर असून आश्चर्यकारक निसर्ग बदल दाखवते.
फुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोम्बर मध्यापर्यंत चालू राहतो, या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतात. तुम्ही पिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात मंत्रमुग्ध करणारे बदल पाहू शकता. कारण फुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतात. तुमच्या सहलीचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज आणि फुले बहरण्याचा मुख्य हंगाम लक्षात घेणे गरजेचे आहे. बऱ्याच दुर्मिळ फुलांच्या प्रजाती ह्या कालावधीत बघण्यास मिळतात.
कास पठार वर जाण्यासाठी प्रवेश शुल्क
- प्रती व्यक्ती रू.150/- ऑनलाईन बुकींग केल्यास प्रिंट असणे अनिवार्य असेल, मोबाइल स्क्रीनशॉट ग्राह्य धरले जाणार नाहीत (12 वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत).
- विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत : शुल्क प्रति व्यक्ती रु.40/-. शाळा / कॉलेज प्रमुखांचे पत्र अनिवार्य असेल. पत्र नसल्यास सवलत दिली जाणार नाही. शनिवार, रविवारी सवलत मिळणार नाही.
- गाईड सुविधा : शुल्क – रु.100/- प्रति तास. (दहा व्यक्तींसाठी एक गाईड )
- सायकल राईड: शुल्क रु.50/- प्रती तास ( राजमार्ग ते कुमुदी तलावापर्यंत )
कास पठार जाण्यासाठी संपर्क क्रमांक
सोमनाथ जाधव : 9422592035 दत्तात्रय एस. किर्दत : 8698993553
ज्ञानेश्वर आखाडे : 8600523113 विठ्ठल कदम : 8459876484
रामचंद्र उंबरकर : 9422608996