(रत्नागिरी / वार्ताहर)
धामणसें हटवाडीतील पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांची समस्या दूर होईल. नागरिकांना पुलाच्या वापरासोबत जलसंधारणही महत्त्वाचे असल्यामुळे मी सार्वजनिक बांधकाममंत्री झाल्यानंतर पूल व जलसंधारणही व्हावे, असे मॉडेल बनवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शेतीसाठी पाणीही मिळेल. पुलाचे काम सुरू झाल्यावर वेळेतच पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
धामणसें येथे तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पूल व रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, फक्त कोकणात दानशूर मंडळी आहेत. त्यामुळेच गावात शाळा उभ्या राहिल्या. आज श्रीनिवास कानडे व कुटुंबियांनी पुलासाठी जागा उपलब्ध करून दिली, याबद्दल विशेष आभार मानतो. सर्वांनी उभे राहून कानडे काकांचे कौतुक करूया. दिवंगत पंतप्रधान अटलजींनी प्रधानमंत्री सडक योजना सुरू केली व मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवेदनशील पंतप्रधान आहेत. त्यामुळेच त्यांनी महिला, युवक, बारा बलुतेदार यांच्यासाठी योजना आणल्या. लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यात पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून मोदी निवडून येण्याकरिता सर्वांनी योगदान द्यावे.
माजी नगरसेवक, धामणसें गावचे सुपुत्र तथा भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उमेश कुळकर्णी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानताना गेल्या वीस वर्षांत या मागणीकडे कोणीही पाहिले नाही. भाजपच्या आमदार स्व. कुसुमताई अभ्यंकर यांच्या माध्यमातून फूटब्रिज झाल्याचे सांगितले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचेही या पुलासाठी सहकार्य लाभले. मंत्री चव्हाण यांनी स्वतः लक्ष घालत हे काम करण्याची ग्वाही दिली. हटवाडी, चौकेवाडी, बौद्धवाडी, खरवते गावाला जोडणारा हा पूल आहे. पुढील वर्षी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करू. वेळोवेळी पाठपुराव्याचे काम अनिकेत पटवर्धन यांनीही केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी प्रास्ताविकामध्ये पुलाची माहिती देऊन मंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात हा पूल पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा संयोजक, माजी आमदार प्रमोद जठार, गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश शेवडे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, माजी उपसभापती किसन घाणेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, राजू भाटलेकर, डॉ. चंद्रशेखर निमकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, आदी उपस्थित होते.
सरपंच अमर लोगडे, उपसरपंच अनंत जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री चव्हाण यांचा भलामोठा हार घालून सत्कार केला. पुलासाठी पाच गुंठे जागा विनामोबदला दिल्याबद्दल श्रीनिवास कानडे व कुटुंबियांचा सत्कार मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. खरेदी विक्री संघाच्या संचालिका तथा ग्रामपंचायत सदस्य सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पाचशेहून अधिक ग्रामस्थ, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मंत्री चव्हाण यांचा सत्कार रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट व माध्यमिक विद्यालय धामणसे, हटवाडी ग्रामस्थ आदींच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी मंत्री चव्हाण यांना पांचाळवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले व सत्कार केला.
भाजपाचे शक्तीप्रदर्शन
नेवरे बाजारपेठ ते धामणसे या मार्गावर भाजपाने शक्ती प्रदर्शन केले. भाजपाचे झेंडे सर्वत्र झळकले होते. सुमारे १०० दुचाकींवरून भाजपा कार्यकर्ते आणि पाठोपाठ सुमारे ५० चारचाकी गाड्यांमुळे भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले. धामणसे येथे जाईपर्यंत मोठी रांग पाहायला मिळाली.
दिवार लेखन
भाजपच्या “अब ४०४ पार” या घोषणेचे दिवार लेखनही याप्रसंगी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.