(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ, जाकादेवी ,चाफे ,कळझोंडी, खंडाळा परिसरात दिवाळीच्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर या ४ दिवसांच्या कालावधीत तब्बल ६५ तास वीज पुरवठा खंडित होता. नैसर्गिक वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अनेक गावांमध्ये विद्युत खांब कोलमडून पडले होते ,अखेर वीज महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने वीज पुरवठा सुरळीत चालू झाला आहे.मात्र विजे विना जनजीवन विस्कळित झाल्याने परिसरातून वीज पुरवठा खात्यावर ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विजेअभावी अनेक गावं पाण्याविना हैराण झाली.
दि.३१ रोजी तरवळ मायंगडेवाडी येथे सुमारे ८ ते १० विद्युत खांब कोलमलून पडले. गेले चार दिवस या परिसरातील पडलेले पोल उभे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. मात्र गेली अनेक वर्ष या परिसरातील गंजलेले पोल तसेच विद्युत तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या, झाडे झुडपे तोडून विद्युत लाईट सुरळीत करणे याबाबत काही ग्रामपंचायतीतून निवेदने, अर्ज देऊन वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र तरीही वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कामकाजामुळे अनेकदा या परिसराला विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे.
आजच्या विज्ञान आणि स्पर्धेच्या युगात क्षणाक्षणाला वीज पुरवठा अत्यंत महत्त्वाचा असतो. वीज पुरवठ्यावरच येथील मोबाईल टॉवर तसेच जिल्हा परजिल्हा,राज्य, देश परदेशामध्ये असलेला संपर्क सातत्याने सुरळीत राहावा, यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते .वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे देव-घेवीचे व्यवहार, एटीएम सेवा खंडित झाली होती. शेतकऱ्यांचा भाजीपाला, आईस्क्रीम, दही, ताक, कोल्ड्रिंक्स अशा नाशिवंत पदार्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कळझोंडी धरण येथील जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना गेले चार दिवस बंद अवस्थेत आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्याविना मरण यातना भोगाव्या लागल्या. ऐन दिवाळीची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावामध्ये कुटुंबियांसमवेत दाखल झालेले आहेत. त्यांनाही या वीज पुरवठ्याच्या खंडितपणामुळे हैराण व्हावे लागले.
वीज वितरण कंपनीने परिसरातील गंजलेले लाईटचे खांब तसेच झाडे-झुडपे जी विद्युत तारांवर आलेली आहेत. ती साफसफाई करून विद्युत तारा सुरळीत चालविण्यासाठी उत्तम कामगिरी करावी, अन्यथा येथील ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची तयारी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या कारभारामध्ये सुधारणा करण्यात यावी .परिसरातील पोल विद्युत तारा, डीपी अशा महत्त्वाच्या बाबींची योग्य वेळी तपासणी करण्यात यावी, तसेच वीज वितरण कंपनीचे चाफे येथे असलेले कार्यालयातील टेलिफोन सेवा ही सातत्याने बंद अवस्थेत असल्याने ही टेलिफोन व्यवस्था ग्राहकांच्या माहितीसाठी त्वरित उपलब्ध करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे .
तरी इथून पुढे या भागातील वीज वितरण कंपनीचा कारभार उत्तम सेवा देण्यासाठी कार्यवाहीसाठी सज्ज ठेवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. चार दिवस उलटूनही कळझोंडी -मालगुंड परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे.