(चिपळूण)
खैर लाकडांच्या खरेदी-विक्रीचा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याच्या संशयावरून तालुक्यातील सावर्डे-दहिवली येथे बुधवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून सहा जणांना अटक केली आहे. सोमवारी त्या सर्वांची पोलिस कोठडी संपताच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
याप्रकरणी वसीम अख्तर मुक्तार अहम मोमीन (७८, इस्लामपूर मस्जीदजवळ, इस्लामपूरा, भिवंडी ठाणे), असिफ रशीद शेख (नगरसूल, नाशिक), फारुख शेरखान पठाण (येवला रोड, नाशिक), शाहनवाज प्यारेजन (बल्लापूर, कर्नाटक), इशाद युसूफ शेख (संगमनेर, अहमदनगर), तर स्थानिक मुआज रियाज पाटणकर (अडरेकर मोहल्ला, सावर्डे, चिपळूण) अशी अटक असलेल्यांची नावे आहेत.
वसीम मोमीन हा बेकायदेशीररीत्या खैराच्या लाकडांची चोरटी वाहतूक करत होता आणि त्यातून मिळणारा पैसा हा काही धार्मिक कट्टरवादी व्यक्ती आणि संघटनांना देत असल्याचे समोर आले होते. असे असतानाच दहिवली येथे मुआज पाटणकर याने भाडेतत्त्वावर जागा घेऊन जेथे कर्नाटक राज्यातून आणलेला खैर लाकूडसाठा लपवून ठेवला होता. त्या ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून लाकूडसाठा जप्त करत याप्रकरणी सहा जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडी संपताच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.