(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
जिंदाल कंपनी एका बाजूला कोळशाची काळी बुकटी तर दुसऱ्या बाजूला राखेचे साठवलेले मोठं-मोठे ढिगारे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. जिंदाल कंपनीने मनमानीपणाचा कळस गाठला आहे. येथील नागरीकांना उद्ध्वस्त करण्याचे ठरवलेय का असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कोळशाची हानिकारक राख गावच्या माथ्यावर टाकू नये यासंदर्भात नांदिवडे गावातील ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी हा राखेचा ढीग करावा असे देखील सुचित करण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांच्या म्हणण्याला किंमत न देता जिंदाल अधिकाऱ्यांनी राखेचा ढीग नांदिवडे गावच्या माथ्यावरच साठवला. यातून आज विषारी कोळसा धुळीने नागरीक त्रस्त झाले आहेत.
लोकशाहीच्या राज्यात जिंदाल कंपनीने स्थानिक ग्रामस्थांना लाथाडून गावच्या माथ्यावर राखेचे महाभयंकर ढीग उभारले. काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, आधुनिक पद्धतीद्वारे आम्ही ते साठवून ठेवत आहोत. काही त्रास होणार नाही परंतु आज राखेचा ढीग सुमारे १०० फुटांपर्यंत उंच गेलेला आहे. तो वाढतच चालला आहे. हिवाळा उन्हाळ्यात नांदिवडे परिसरातील पहिले- अंबु, संदखोल, अंबुवाडी, बागवाडी, घोगळवाडी या ठिकाणी ही राख मोठ्या प्रमाणात उसळत आहे. विषारी कोळसा-धुळीचा नागरीकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या गावात विषारी कोळसा धुळीने त्रस्त असलेल्या नागरिकांकडे लक्ष देणारे लोकप्रतिनिधी गेलेत कुठे? जिल्हाधिकारी साहेब या दुर्गम भागातील नागरिकांच्या व्यथा कधी जाणणार? आता तरी मनमानी करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार का? असे संतप्त सवाल स्थानिक करीत आहेत.
आरोग्य धोक्यात, शेतीवरही परिणाम
डंप केलेल्या विषारी कोळसा बुकटीचा आंबा काजू व इतर पिकांवर परिणाम दिसून येत आहे. गावामध्ये श्वसनाचे आजार, दमा लागणे यासारखे आजार वाढत असून लोकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात राख मोठ्या प्रमाणात नांदिवडे गावातील किनारी शेतीमध्ये पसरत असून शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे. गावातील विहिरी प्रदूषित होत आहे, अशा स्थितीत नागरीकांना जीवन जगावे लागत आहे. मात्र पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
महाभयंकर त्रासातून मुक्त करावे…
जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून हे राखेचे ढीग हटवण्यात आले नाहीत. पर्यावरण, आरोग्य विभागाने हे लक्षात घेऊन जिंदाल कंपनीवर योग्य ती कार्यवाही करावी व गावातील लोकांना विषारी राखेच्या महाभयंकर त्रासातून मुक्त करावे. स्थानिक प्रतिनिधी ते जिल्हास्तरातील प्रतिनिधींनी नांदिवडे गावातील जनतेसाठी एक हात मदतीचा द्यावा आणि मरणाच्या दारातून जनतेला वाचवावे अशी सर्व ग्रामस्थांकडून विनंती आहे, अशी माहिती नांदिवडे गावातील ग्रामस्थांनी सुपूर्त केली आहे.