(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा खालगावचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत उर्फ अण्णा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून जयवंत जाधव यांचे गावातून अभिनंदन होत आहे.
जयवंत उर्फ अण्णा जाधव यांना एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध व्यावसायिक असून गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी जयवंत जाधव यांनी गेली अनेक वर्ष खालगाव परिसरामध्ये उल्लेखनीय आणि प्रशंसनीय काम केले. जयवंत जाधव यांचे गावातील तसेच परिसरातील गावातील जनतेशी सलोख्याचे संबंध आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
अण्णा जाधव यांच्या दोन वर्षांची उत्तम कामगिरी लक्षात घेऊन ग्रामस्थांनी जयवंत जाधव यांच्याकडे तिसऱ्यांदा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत. गावातील जनतेने आपणाला सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान केल्याबद्दल श्री.जाधव यांनी ग्रामस्थांना धन्यवाद दिले.