( राजापूर / राजन लाड )
तालुक्यातील जैतापूर येथील जि.प. शाळा जैतापूर नं.1 या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहायक शिक्षक मिळावा यासाठी पालकांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन न करता सहकार्य केले. मात्र प्रशासनाने पुन्हा एक शिक्षक कमी केल्याने पालक आक्रमक झाले. त्यांनी पुन्हा एकदा जैतापूर शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी, आमदार किरण सामंत यांना दिले होते.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जैतापूर न. 1 येथे सेमी इंग्रजी शाळेमध्ये दोन पूर्णवेळ शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यापासून एक कामगिरी शिक्षक दिला होता. तसेच सहाय्यक शिक्षक तेही आलटून पालटून कार्यरत होते. परंतु गेला महिनाभर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी राजापूर यांच्याकडे वारंवार विनंती करूनही देखील शिक्षक न मिळाल्याने पालक वर्ग तसेच सरपंच यांनी भेटून प्रत्यक्ष विनंती केली, परंतु संबंधित विभागाने त्यावेळी चार पाच दिवसात शिक्षक देतो असे सांगून पालकांची बोळवण केली होती.
पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक पुन्हा एकदा आज 7 फेब्रुवारी रोजी पासून शाळा बंद आंदोलन करणार असल्याचे प्रशासनाला कळविले होते. आपल्या पाल्याना शाळेत न पाठवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. याबाबत गटशिक्षणाधिकारी राजापूर यांना निवेदन देण्यात आले होते .
6 फेब्रुवारी पर्यंत शाळेला शिक्षक देण्याचे लेखी पत्र मिळाले तर शाळा बंद आंदोलनाचा फेर विचार करू अन्यथा आमच्या मागणीचा विचार न केल्यास होणाऱ्या आंदोलनाला व पाल्याचं नुकसानीला आपण जबाबदार असाल असे शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी, सर्व पालक वर्ग यांनी कळविले होते.
त्याप्रमाणे आज दिनांक 7 फेब्रुवारी 25 पर्यंत दुसरा शिक्षक न दिल्याने पालकांनी मुलांना घेऊन शाळेच्या गेट बाहेर आंदोलन सुरू केले. मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. नंतर सरपंच राजप्रसाद राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एक शिक्षिका आपण कामगिरीवर पाठविले असल्याचे सांगण्यात आले.
दुपारी बाराच्या सुमारास कामगिरी वरील एक महिला शिक्षिका दाखल झाल्याने पालकांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले असून कायमस्वरूपी शिक्षक मिळावा या मागणीवर पालक ठाम आहेत. या शैक्षणिक वर्षापुरता कामगिरी वरील शिक्षकांना हलवू नये, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा यासाठी पालकांनी आग्रही मागणी केली असून प्रसंगी आपल्या पाल्यांसह पंचायत समितीवर धडक देण्याचे इशाराही दिला आहे.