(संगमेश्वर)
जय शिवराय तरुण मित्रमंडळ कोंडगाव साखरपा पंचक्रोशी यांच्यावतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी करण्यात येते. यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आदी उपक्रमांचा समावेश असतो. यंदाचे मंडळाचे आठवे वर्ष आहे. यावेळी परिसरातील स्थानिक खेळाडूंच्या प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन काल रात्री पार पडले. यावेळी जया माने, प्रवीण जोयशी, अमित केतकर, संजय सुर्वे, अमोल लाड, मारुती शिंदे, जितेंद्र जोयशी, संतोष चव्हाण, नेत्रा शिंदे, साक्षी चव्हाण, स्वरूपा कदम, सौ. कदम, कोरे मॅडम उपस्थित होते. यावेळी आकर्षक अशी सजावट करून स्थापन करण्यात आलेल्या शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेची सुरवात झाली. मैदानेचे श्रीफळ वाढवून, फित कापून व आकर्षक चषकांचे अनावरण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेत सिद्देश पावसकर, रुपेश कदम, सागर तांदळे यांच्या मालकीचा शिवतेज वोरीयर्स, केतन दुधाने यांचा भडकंबा, सतिमाता जाधववाडी, अरुण गोरुले यांचा गंगादेवी पुर्ये, बावकर यांचा संघर्ष दाभोळे संघ सहभागी झाला आहे. पुढील दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. दिनांक 18 फेब्रुवारीला विशालगड किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात येणार आहे. या उपक्रमाला 8 वर्षाची परंपरा लाभली आहे. या उपक्रमास शेकडो शिवप्रेमी सहभागी होतात. त्याचबरोबर 19 फेब्रुवारीला सकाळी महाराजांचे पूजन व आरती, सायंकाळी भव्यदिव्य अशी शोभायात्रा पार पडणार आहे. यामध्ये पारंपारिक देखावे, ढोल, ताशा, डीजे, झंज पथक दिसणार आहे. रात्री 9 वाजता दीपोत्सव व त्यांनतर स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जय शिवराय मित्रमंडळच्या वतीने करण्यात आले आहे.