(खेड / भरत निकम)
मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा खेडला जोरदार तडाका बसला आहे. बुधवारी पहाटेपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील मटण मार्केट जवळील पूर नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री 10 वाजता जगबुडी नदीची पातळी 8.00 मी. होती. या नदीसाठी इशारा पातळी 5.00 मी. आहे, तर धोका पातळी 7.00 आहे. काल रात्री जगबुडी नदीची पातळी 8.00 झाल्याने धोका पातळी ओलांडली आहे.
बुधवारी सकाळपर्यंत ४३ मि.मी. पाऊस झाला असून शिर्शी मंडळ ३० मि.मी.., भरणे मंडळ ४५ मि.मी., आंबवली मंडळ १०२ मि.मी., कुळवंडी मंडळ ४७ मि.मी.., लवेल मंडळ ५८ मि.मी. व धामनंद मंडळ ७२ मि.मी.असा एकूण आजचा पाऊस ३९७ मि.मी. तर सरासरी ५६ : ७१ मि.मी. तर आजपर्यंतची एकूण सरासरी २४९८ : ७६ मि.मी.अशी आहे. अशाच आठवडा भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेडची बाजारपेठ २२ तास पाण्याखाली होती. तर नारंगी नदीमुळे खेड दापोली मार्ग बंद झाला होता. पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे पुराचे पाणी ओसरले होते. यातून बाजारपेठ आणि व्यापारी सावरत असतानाच पुन्हा जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने व्यापारी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. जगबुडी नदीतील गाळ काढण्याला झालेला उशीर याला कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडून ती ७ : ४५ मीटर एवढी होती. जगबुडी नदीचे पाणी प्रवाहाबाहेर आल्याने देवणा पूल आणि तांबे मोहोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर मटण मार्केटजवळ पाणी आल्याने नगरपालिकेने भोंगा वाजवून व्यापारी आणि नागरिकांना सतर्क केले. खेड आपेडे मार्गावरील शिरवली येथे गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या गाडीवर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर शहरातील स्वामी समर्थ मंदिराशेजारी झाड कोसळले आहे.