( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणच्या ग्रामीण भागात आंबेडखुर्द येथील आपल्या मूळ घरातील विविध घटक लेखनाचा विषय करुन संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशनच्या घनश्याम पाटील यांनी तयार केलेले मंतरलेले दिवस या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चपराक प्रकाशन पुणे तर्फे कोकणचे लेखक जे. डी. पराडकर यांच्या कोकण वरील सलग नवव्या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्यावर करण्यात आले. यावेळी चपराकचे संपादक घनश्याम पाटील, एकनाथ आव्हाड, रवींद्र बेडकिहाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
मंतरलेले दिवस या पुस्तकाची पाठराखण ज्येष्ठ लेखक सुरेश जोशी यांनी केली असून प्रस्तावना कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिली आहे. या पुस्तकात जे. डी. पराडकर यांनी आंबेडखुर्द येथील त्यांच्या मूळ घरातील व्यक्ती, प्राणी, गडी – माणसं यावर विस्तृत आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे लेखन केले आहे. या कथा वाचकांना खिळवून ठेवतात.
वाचकांना आपल्या बालपणाची आठवण करुन देणारं लेखन !
लेखक जे. डी. पराडकर यांनी खूप बारकाईने निरीक्षण करुन कोकणवर विपुल लेखन केलं आहे. चपराकने कोकणवर प्रकाशित केलेलं त्यांचे हे सलग नववं पुस्तक आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना मिळणं हा पराडकर यांच्या लेखनाचा गौरव आहे. या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
—- घनश्याम पाटील संपादक चपराक, पुणे