(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कारवांचीवाडी येथील वासू दौलत कडपकट्टी या बावीस वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना सोमवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरीतील कुवारबाव आरटीओ कार्यालयानजीक घडली.
वासू आणि त्याचे काही मित्र दुपारी रवींद्रनगर येथे गप्पा मारत बसले होते. मित्र घरी निघून गेल्यावर वासू थेट आरटीओ कार्यालयाजवळील रेल्वे रुळावर आला. त्याने मित्राला फोन करून ‘मॅटर झालाय लवकर ये’ असे सांगितले. त्यानंतर त्याचे मित्र तातडीने तिथे पोहोचले, मात्र तोपर्यंत वासूचा मृत्यू झाला होता.
वासूने स्वतःला रेल्वे गाडीखाली झोकून दिल्याने डोके शरीरापासून वेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच तेथील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह व पाहून अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहत होते. मात्र वासू कडपकट्टी (२२, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याने आत्महत्या का केली? याची माहिती अजून पुढे आलेली नाही. वासू हा त्याच्या वडिलांसोबत सेंट्रिगचे काम करत होता. सोमवारी तो वडिलांसोबत कामासाठी गेला नव्हता. त्याला अजून एक भाऊ असून, तो राजापूर येथे कामासाठी गेला असल्याची माहिती पुढे येत आहे.
सोमवारी दुपारी पावणेचार ते चार यादरम्यान हा प्रकार घडला. लगेचच याबाबतची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली. शहर पोलिसांचे पथक काहीवेळातच घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचे शीर धडावेगळे झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलिस स्थानकात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.