(लांजा)
नळपाणी योजनेचे पूर्ण होऊन वर्ष झाले तरी ठेकेदार नळपाणी योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यास दुर्लक्ष करत असल्याने येत्या मार्च ते मे महिन्यात पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे आडवली सरपंच रमेश घाग यांनी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सरपंच घाग यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन योजनेतून आडवली नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत सुधारात्मक दुरुस्ती करणे व आडवली चौक वाडी नळपाणी पुरवठा योजना सुधारात्मक दुरुस्ती करणे अशी दोन कामे मंजूर झाली होती. टाकेवाडी, मधली वाडी नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसून, चौकवाडी नळपाणी पुरवठा योजना व तांबळवाडी, वनवाडी, डांगरेवाडी या दोन्ही नळपाणी पुरवठा योजनेचे काम नऊ महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. वारंवार कळवूनही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करुन चालढकल करत आहे. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय लांजा उपअभियंता यांच्याकडेही वारंवार कळवून व पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मार्च ते जून या चार महिन्यांमध्ये पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे, अशी भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीची दखल न घेतल्यास…
जेथील काम पूर्ण झाले आहे, तेथील वाड्यांमध्ये त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा व वेळेवर पाणी पुरवठा न केल्याने ठेकेदाराने वनवाडी, तांबळवाडी, डांगरेवाडी, आगरेवाडी व चौकवाडीला तीन महिने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा सरपंच घाग यांनी या निवेदनातून दिला आहे.