(नवी दिल्ली)
देशाची गुप्तचर संस्था संशोधन आणि विश्लेषण शाखेच्या (रॉ) प्रमुखपदावर छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मान्यता देण्यात आली. सामंत कुमार गोयल यांचा रॉ प्रमुखपदाचा कार्यकाळ ३० जून रोजी संपणार असल्याने त्यांच्या जागी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.
Ravi Sinha, IPS (CG:88) to be the new Secretary, Research & Analysis Wing. pic.twitter.com/vEr3hfokZJ
— ANI (@ANI) June 19, 2023
रवी सिन्हा हे मूळचे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९८८ मध्ये युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून मध्य प्रदेश कॅडर प्राप्त केले. मात्र, २००० साली तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मध्य प्रदेशातून छत्तीसगड राज्याची निर्मिती केली. तेव्हा सिन्हा तांत्रिकदृष्ट्या छत्तीसगड कॅडरमध्ये गेले.