इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव अमिरातीत पार पडला. अनेक विक्रमी व ऐतिहासिक ठरलेल्या या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावात 24.75 कोटींना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक भाव खाऊन गेला ज्यामुळे आता तो आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले आहे.
स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. याच लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टार्कने आपल्या संघाच्या कर्णधाराचाही विक्रम मोडला. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरुवातीला चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. 9.40 कोटींची बोली लावल्यानंतर दिल्ली तेथे थांबली. तर मुंबई संघाने सर्वाधिक 9.60 कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर गुजरात आणि कोलकाता यांच्यात सामना पाहायला मिळाला. गौतम गंभीर कोलकात्याच्या टेबलावर तर आशिष नेहरा गुजरातच्या टेबलावर बसला होता. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजासाठी भारताच्या दोन माजी खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. शेवटी गंभीरने बाजी मारली.
39 खेळाडू झाले करोडपती…
या बोबोलीत 39 खेळाडू करोडपती झाले. भारतातील हर्षल पटेल लिलावात सर्वात महाग विकला गेला. त्याला पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात समीर रिझवी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला गुजरात टायटन्सने 10 कोटी रूपयात खरेदी केले. त्याची बेस प्राईस ही 50 लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याच्यासाठी आक्रमकपणे बोली लावली होती.
सॅम करनचा मोडला विक्रम
आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूसाठी २० कोटी रुपयांची बोली लागली. आधी स्टार्कसाठी कोलकाताने तर नंतर हैदराबादने कमिन्यसाठी २० कोटींची बोली ओलांडली. दोन्ही ऑस्ट्रलियाच्या खेळाडूंनी लिलावात सर्वाधिक किंमत मिळवण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या सॅम करनचा विक्रम मोडला. करणला गेल्या वर्षी पंजाबने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
हर्षल सर्वांत महागडा भारतीय खेळाडू
स्लोअर बॉल स्पेशालिस्ट हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बोली युद्ध झाले. गुजरातने १०.७५ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सही सामील झाले. पंजाबने शेवटपर्यंत टिकून राहून हर्षलला ११.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
अनकॅप्ड शाहरुख पुन्हा करोडपती
२०२२ च्या लिलावात ९ कोटी रुपयांना विकला गेलेला अनकॅप्ड फलंदाज शाहरुख खान पुन्हा करोडपती झाला. पंजाब आणि गुजरातमध्ये त्याच्यासाठी बोली युद्ध झाले. शेवटी त्याला गुजरात टायटन्सने ७.४० कोटी रुपयांना विकत घेतले. यासह विदर्भाचा डावखुरा फलंदाज शुभम दुबेला त्याच्या आधारभूत किमतीच्या कितीतरी पटीने बोली लागली. राजस्थानने त्याला ५.८० कोटी रुपयांना विकत घेतले.
समीर रिझवीसाठी ४२ पट अधिक किंमत
यूपी टी-२० लीगमध्ये चमकणारा २० वर्षीय अनकॅप्ड बॅट्समन समीर रिझवीसाठी त्याच्या मूळ किमतीपेक्षा ४२ पट जास्त बोली लागली. चेन्नईने त्याला ८.४० कोटी रुपयांना खरेदी केले. समीरची मूळ किंमत २० लाख रुपये होती. रिझवी यूपी टी-२० लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या समीरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ११ लिस्ट-ए आणि ११ टी-२० सामने खेळले आहेत. उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये त्याने कानपूर सुपरस्टार्सकडून खेळताना १० सामन्यांमध्ये ४५५ धावा केल्या होत्या.
सर्वांत महागडे खेळाडू(सर्व आकडे कोटींमध्ये)
– मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)ः २४.७५ (कोलकात नाईट रायडर्स)
– पॅट कमिन्स(ऑस्ट्रेलिया)ः २०.५० (सनरायझर्स हैदराबाद)
– डॅरिल मिशेल(न्यूझीलंड)ः १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
– हर्षल पटेल(भारत)ः ११.७५ (पंजाब किंग्ज)
– अल्जारी जोसेफ (वेस्ट इंडिज)ः ११.५(रॉयल चँलेंजर्स बंगळुरू)
– समिर रिझवी(भारत)ः ८.४० (सनरायझर्स हैदराबाद)
– रोव्हमन पोव्हेल(वेस्ट इंडिज)ः ७.४०(राजस्थान रॉयल्स)
– शाहरूख खान(भारत)ः ७.४०(गुजरात जायंट्स)
– कुमार कुशाग्र(भारत)ः ७.२० (दिल्ली कैपिटल्स)
– ट्रॅव्हिस हेडची(ऑस्ट्रेलिया)ः ६.८० (सनरायझर्स हैदराबाद)
बोली लागलेले अन्य खेळाडू
– शिवम मावीः ६.४० (लखनौ सुपर जायंट्स)
– उमेश यादवः ५.८० (गुजरात टायटन्स)
– शिवम दुबेः ५.८० (राजस्थान रॉयल्स)
– गेराल्ड कोएत्झीः ५ (मुंबई इंडियन्स)
– ख्रिस वोक्सः ४.२ (पंजाज किंग्ज)
– शार्दुल ठाकूरः ४(चेन्नई सुपर किंग्ज)
– यश दयालः ५ (आरसीबी)
– सुशांत मिश्राः २.२०(गुजरात जायंट्स)
– मनिमरन सिद्धार्थ- २.४० (लखनऊ सुपर जायंट्स)
– वानिंदु हसारंगा- १.५० (सनराइजर्स हैदराबाद)
– रचिन रवींद्र- १.८० (चेन्नई सुपर किंग्ज)
– हॅरी ब्रूकः ४ (दिल्ली कैपिटल्स)
– जयदेव उनादकः १.६०(सनराइजर्स हैदराबाद)
अनसोल्ड खेळाडू
स्टीव स्मिथ, करुण नायर, मनीष पांडे, रीली रॉसो, जोश इंग्लिस, फिल साल्ट, कुसल मेंडिस, लॉकी फर्ग्यूसन, जोश हेजलवुड, तबरेज शम्सी, मुजीब उर रहमान, अकील हुसैन, ईश सोढ़ी, आदिल रशीद, सौरव चौहान, पुंकित नारंग, कुलदीप यादव, विष्णु सोलांकी, राज बावा.