(कोल्हापूर)
कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात तरुणाचा मृतदेह गुरुवारी आढळला होता. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला असून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवल्याचं समोर आलं आहे. दुसऱ्या मुलाच्या मदतीनेच उच्चशिक्षित मुलाचा वडिलांनी खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मृताचे वडील दत्ताजीराव थोरात व भाऊ अभिजित थोरात यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी गावातील दत्ताजीराव थोरात यांचा मुलगा अमरसिंह थोरात याचा मृतदेह कागल तालुक्यात आढळला होता. अमरसिंह दहा वर्षे पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. मात्र यश न मिळाल्याने सध्या त्याने घरी अभ्यास सुरू करून तो कोल्हापुरात वकिलीचे शिक्षणही घेत होता.
अमरसिंहला दारूचे व्यसन असल्याने तो घरात वारंवार भांडण करत होता. अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून वडिलांनी अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. हा घाव वर्मी बसल्याने अमरसिंहचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर घाबरून त्यांनी मृतदेह गाडीत घालून कागल रस्त्यावर रस्त्याकडेलाच टाकला होता. या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केलेच्या खुणा होत्या. पंचनामा करताना तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले. त्यावरून त्याचे नाव अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय ३०) असल्याचे समजले.