(रत्नागिरी / प्रतिनिधी)
केंद्र सरकारने अंगीकृत केलेल्या राष्ट्रीय सहकार निगमने पुणे वैकुंठभाई मेहता इंस्टिट्यूटमध्ये शनिवारी आंतरराष्ट्रीय अभ्यास वर्गात समाविष्ट सहकार प्रतिनिधींसमोर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची यशोगाथा मांडण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या तीन संस्थांचे प्रेझेंटेशन संपन्न झाले. त्यामध्ये पतसंस्था वर्गामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची माहिती, कार्यपद्धती, संख्याकीय प्रगती, प्राप्त पुरस्कार, इत्यादी बाबत प्रेझेंटेशन करण्यात आले.
तीन देशांच्या २५ प्रतिनिधींसमोर स्वरूपानंद पतसंस्था मांडता आली आणि या प्रेझेंटेशनसाठी स्वरूपानंदची केलेली निवड ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर कोकणातील सहकारी संस्था मांडली जाते हे कोकणातल्या सहकार क्षेत्रासाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे, असे प्रतिपादन दिपक पटवर्धन यांनी केले. NCDC या केंद्रीय संस्थेने केलेल्या या आयोजनात जी संधी दिली त्याबद्दल या राष्ट्रीय संस्थेचे आभार दीपक पटवर्धन यांनी मानले.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सलग १० व्या वर्षी बँको ब्लू रिबन सन्मान घोषित
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २५० ते ३५० कोटी ठेव वर्गामध्ये ब्लू रिबन सन्मान घोषित झाला आहे. सलग १० व्या वर्षी हा सन्मान संस्थेला प्राप्त होत आहे. अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा या संस्था प्रतिवर्षी संस्थांची कामगिरी पाहून सन्मानित करतात.
हा सन्मान संस्थेने सहकारी आर्थिक क्षेत्रात केलेले शिस्तबद्ध काम संस्थेची लोकप्रियता, विश्वसार्हता याची पावती म्हणावी लागेल.” सलग १० वर्ष असा सन्मान प्राप्त करणारी संस्था” अशी बिरुदावली स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला प्राप्त झाल्याबद्दल मनस्वी आनंद होतो, असे संस्थेचे अध्यक्ष दिपक पटवर्धन म्हणाले. हा पुरस्कार प्राप्त करण्यामागे ४५ हजार सभासदांची प्रेरणा, हीच मोठी ताकद असल्याचे अध्यक्षांनी आवर्जून नमूद केले.