( संगमेश्वर / प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये एकात्मिक शेती पद्धती प्रात्यक्षिक प्रकल्प सुरु असुन या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समृद्ध करण्यासोबतच त्यांना उत्पन्नाचे विविध स्त्रोत उपलब्ध करून देणे व कमी जागेत अधिक उत्पन्न मिळविण्यावर भर देणे हा आहे. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी व चिपळूण तालुक्यातील १०० निवडक शेतकऱ्यांना आधुनिक एकात्मिक शेती करिता प्रोत्साहन देऊन त्यांचे उत्पादन वाढवण्यासोबतच पर्यावरणपूरक शेतीसह आर्थिक लाभ मिळवून देणे हा प्रमुख हेतू आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे संशोधक आणि जे. एस. डब्ल्यू. फाऊंडेशन चे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना विविध आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत असुन या प्रकल्पामध्ये जैविक खते, तंत्रज्ञानाधारित बियाणे, पशुधन, सेंद्रीय शेती, चारा उत्पादन, आंबा पिकावरील व्यवस्थापन आणि काजू प्रक्रिया या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या वतीने नियमितपणे तांत्रिक मार्गदर्शन देखील देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा/प्रशिक्षणाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन जे. एस. डब्लू. फाऊंडेशन, सी. एस. आर. हेड अनिल दधीच यांनी केले आहे व या उपक्रमामुळे भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि सुलभ मार्गाने शेतीतून अधिक उत्पादन घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यापीठाचे प्रोजेक्ट सहाय्यक मंथन सावंत, आशिष चोरगे कार्यरत असुन यासाठी त्यांना विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण संचालनालय डॉ्. पराग हळदणकर, प्रोजेक्ट इन्चार्ज डॉ. संतोष वरवडेकर, डॉ. मंदार खानविलकर तसेच जे. एस. डब्लू. फाऊंडेशन, सी. एस. आर. हेड अनिल दधीच, जे. पी. टी. एल. हेड वैभव संसारे, मयुर पिंपळे, भूषण दळवी, पवन भडसावळे, कार्यरत गावातील सरपंच तसेच कृषी अधिकारी यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य लाभत असते. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून यामार्फत त्यांना शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शन मिळत आहे. शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले आणि या प्रकारच्या उपक्रमामुळे त्यांना स्वावलंबनासाठी नवा मार्ग सापडल्याचे सांगितले.