(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी- हातखंबा मार्गावर ठाण मांडलेल्या मोकाट जनावरांमुळे दुचाकी, चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका असतानाही जिल्हा प्रशासन झोपी गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करा, अशी मागणी जोर धरत आहे.
रत्नागिरी-हातखंबा मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर सकाळी व सायंकाळच्या वेळी मोकाट जनावरे कळपाने बसलेली पाहायला मिळतात. रेल्वेस्टेशन येथे अशाच बसलेल्या जनावरांच्या कळपातील एका वासराला ट्रकची ठोकर बसून जागीच मरण पावले. ठोकर देणाऱ्या ट्रक चालकाला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशा अपघाताच्या घटना घडल्यानंतर नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते. मात्र मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्षित करत असते. गेल्या वर्षी नगर पालिकेने मोकाट जनावरांसाठी चंपक मैदानात शेड उभारली होती. रस्त्यावरील सर्व जनावरांना त्या शेडमध्ये ठेवण्यात आले होते. ह्या उपाययोजनेबाबत रत्नागिरीकरांनी प्रशासनाचे स्वागत देखील केले होते. मात्र पुन्हा मोकाट जनावरांच्या त्रासाच्या समस्येने वाहन चालकांचे नागरिकांना हैराण केले आहे. प्रशासनाने तत्काळ भूमिका घेणे अपेक्षित आहे.
रात्रीच्या अंधारात होतात अपघात
काही वेळेस ठाण मांडून बसणारी जनावरे पूर्ण रस्ताच अडवतात. बसलेल्या कळपाच्या बाजूने वळसा मारून मोठ्या वाहनांना जावे लागते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. रात्रीच्या वेळी देखील ही जनावरे रस्त्यात बसलेली दिसून येतात. रस्त्यात बसलेली जनावरे रात्रीच्या अंधारात काही वेळेला वाहनचालकांना दिसून येत नाही. जनावरांना वाचविण्याच्या नादात अनेक अपघात देखील होतात. विशेषतः कुवारबाव ते कारवांचीवाडी या भागात उनाड जनावरांची मोठी समस्या आहे. रात्रीच्या अंधारात गंभीर अपघात होतात, तर अनेकजण अपघात होऊन जायबंदी देखील झाले आहेत.