(नवी दिल्ली)
राष्ट्रीय लोक दलाचे (रालोद) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया या देशव्यापी आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना शुक्रवारी भारतरत्न सन्मान जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचे नातू जयंत यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. जयंत यांनी पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावरून देताना दिल जीत लिया असे म्हटले. त्यातून त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांनी जयंत यांना भाजपशी मैत्री करणार का अशा आशयाचा प्रश्न विचारला.
आता काही शिल्लक राहिले आहे काय? आपला प्रश्न आज मी कुठल्या तोंडाने नाकारू, असा प्रतिसवाल त्यांनी केला. चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर करण्याची घोषणा मोठा संदेश देणारी आहे. त्या निर्णयाशी देशाच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्या भावनांची जाण असल्याचे मोदींनी दाखवून दिले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
रालोद हा इंडियाचा घटक आहे. रालोद आणि सपमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशातील जागावाटपावर काही दिवसांपूर्वी सहमती झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर रालोद एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अचानकपणे पेव फुटले. अशात चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यापाठोपाठ जयंत यांनी मोदींची प्रशंसा केली. त्यामुळे रालोदच्या संभाव्य एनडीए प्रवेशासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे.