(रत्नागिरी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्या संदर्भात बदनामी व मानहानी झाल्या प्रकरणी चिपळूण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने माजी आमदार रमेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांना दोन दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात नकाश अ. बशीर पिलपिले (रा. सैतवडे, ता. रत्नागिरी) व अपक्ष उमेदवार शकील सावंत (रा. सन्मित्रनगर, ता. रत्नागिरी) यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीत म्हटले होते की, शकील सावंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या विकासासंदर्भातील मुद्दे घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते व चिपळूण विधानसभा मतदार संघातील माजी आमदार रमेश कदम तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष रईस अलवी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक रंग देऊन अक्षेपार्ह विधाने आणि आरोप त्यांच्याविरुद्ध केले होते.
प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, माजी आमदार रमेश कदम व रईस अलवी यांना मुख्याधिकारी तथा आचारसंहिता पथकप्रमुख विशाल भोसले यांनी नोटीस काढली आहे. या नोटिसीद्वारे पत्र मिळताच पुढील २ दिवसांत केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आपला रितसर खुलासा सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.