(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसावर अवलंबून असणारी भातशेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते. भातशेती तसेच वायंगणी शेतीच्या पेरणी, कापणीच्यावेळी संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक सर्प, विंचूदंश झाल्याचे निदर्शनास येत आहे असून केवळ तीन महिन्यात जवळपास 100 जणांना सर्पदंश, विंचूदंश व अन्यं प्राण्यांनी चावा घेतल्याचे ग्रामीण रुग्णालयातील आकडेवारीवरुन लक्षात येत आहे. प्रामुख्याने कापणी, पेरणीच्या वेळी मे ते जूनच्या दरम्यान व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सर्पदंश झाले आहेत. यामध्ये विंचूपेक्षा सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात १५, मे ८, जून २०, जुलै १४ व ऑगस्ट महिन्यात १५ जर्णाना सर्पदंश झालेला आहे. पाच महिन्यात ७२ जणांना सर्पदंश झालेला आहे. तर त्या खालोखाल एप्रिल महिन्यात ९, मे महिन्यात १५, जून १४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात ८ जणांना म्हणजेच पाच महिन्यात ४९ जणांना विंचूदंश झालेला आहे. तर श्वानांनी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ३८ जणांचा चावा घेतलेला आहे. दिवसेंदिवस संगमेश्वरातील सर्पदंशाचे प्रमाण वाढत आहे. सर्प आणि विंचू दंश असे दिवसाला दोन ते तीन रुग्ण सापडत आहेत.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले. तसेच विविध सर्पदंश आणि विंचू दंशावर पुरेसा औषध साठा असल्याचे. त्यांनी सांगितले. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्पदंश आणि विंचू दशांचे प्रमाण मात्र कमी आहे.