(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील पतितपावन मंदिराबाबत आठवीच्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकीची माहिती दिली गेल्याने, इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केला आहे, यात तत्काळ बदल करण्यात यावे, अशी मागणी केली त्यांनी आहे. हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशाराही दिला आहे.
आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात स्वा. वि. दा. सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर भागोजीशेठ कीर यांनी जागा विकत घेऊन हे मंदिर स्वखर्चातून बांधले. तशा प्रकारचा शिलालेखही 1931 साली पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. मंदिरातील दिवाबत्तीचा खर्चही दानशूर भागोजीशेठ यांनी केला. परंतु खोटा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळाकडून विद्यार्थ्यांना शिकवला जात आहे. खरा इतिहास मिटवण्याचे षड्यंत्र रचले जात असून पाठ्यपुस्तक मंडळाने तातडीने ही चूक सुधारावी. याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले होते.
परंतु अद्यापही चूक सुधारण्यात न आल्याने 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा भंडारी समाज संघातर्फे देण्यात आला आहे. याला समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.