(जैतापूर / राजन लाड)
किनारपट्टी भागातील होणाऱ्या स्पर्धांना सर्वतोपरी सहकार्य करणारच, पण त्याबरोबरच किनारपट्टी भागाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आराखडा तयार करून किनारपट्टी भागाचा विकास साधूया असे प्रतिपादन राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी मिठगवाणे येथे केले. राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आमदार चषक हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
आपल्याला आमदारसाहेब, शेठ या नावापेक्षा भैय्या या नावाने मारलेली हाक अधिक आवडते. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा आमदार आहे. आपण सर्वांनी मिळून काम करूया. विकासकामांना उठसूट विरोध सहन केला जाणार नाही, पुढील दोन वर्षात तालुक्याचा संपूर्ण बॅकलॉग भरून काढणार, क्रीडा सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य करणारच पण त्याचबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा सर्वांनी मिळून तयार करूया आणि कामाला लागूया. शासनाकडून मंजुरी आणि निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल असे प्रतिपादन याप्रसंगी आमदार सामंत यांनी केले. मागील 70 वर्षापासून मिठगवाणे येथे हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी ही स्पर्धा आमदार चषक या नावाने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत, विलास चाळके, दिलीप सावंत, संतोष तावडे, अश्फाक हाजू, एडवोकेट शशिकांत सुतार, अजित नारकर, राजा काजवे, जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, मिठगवाणे सरपंच आशा काजवे, प्रशांत गावकर, रमेश काजवे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन फीत कापून आमदार किरण सामंत यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा देखील आमदार सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. बी. कांबळे यांनी केले.