(रत्नागिरी / जिमाका)
सूर्याच्या दिशेप्रमाणे फिरणारे स्वयंचलित गोळप येथील 1 मेगा व्हॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गोळप ग्रामपंचायतींचे वीज बिलापोटी 18 लाख तर, अन्य ग्रामपंचायतींचे 1 कोटी वाचणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
गोळप येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण काल करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, बाबू म्हाप, गोळप सरंपच रफिका तांडेल, उपसरपंच संदीप तोडणकर आदी उपस्थित होते.
कोनशिला अनावरण करुन आणि प्रत्यक्ष बटण दाबून या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सूर्याच्या दिशेप्रमाणे फिरणारे स्वयंचलित सौर पॅनेल असणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीने महाराष्ट्राला आदर्श घालून दिला आहे. वीज बिलापोटी ग्राम पंचायतींचे वाचणारे पैसे अन्य विकास कामांवर खर्च होणार आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक दिव्यांचे वीज बिल शून्यावर असेल. गुहागर तालुक्यात लवकरच दुसरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक पाठींब्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या प्रकल्पातूनही रोजगार निर्मिती होणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार प्रास्ताविकात म्हणाले, वेगवेगळ्या सौर ऊर्जा प्रकल्पाविषयी ऐकले असेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेने उभा केलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. यातून निर्माण होणाऱ्या विजेला प्रती युनिट साडेचार रुपये दर मिळाला आहे. आजपासून वीज निर्मिती सुरु झाली आहे. 19 लाख वीज युनिट मधून 80 ते 85 लाख वर्षाला मिळणार आहेत. यामधून ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक वीज बिलासाठी मदत होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी आभार मानले.