(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली येथील बसस्थानकाचे काम सुरू होऊन अनेक महिने उलटले मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. या सुरू असलेल्या कामामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. एसटी बस भर रस्त्यावरच उभ्या केल्या जात असून प्रवाशांना देखील रस्त्यावरच उभे राहण्याची वेळ येत आहे.
पाली बस स्थानकाच्या अगदी समोरील महामार्गाच्या रस्त्यावर सर्व एसटी बस थांबा घेतात व प्रवाशांना घेऊन पुन्हा आपल्या दिशेने मार्गस्थ होतात. नव्या स्थानकाच्या परिसरात खडी पसरवून ठेवण्यात आली असून बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. मात्र बस स्थानकाचे छोटे-मोठे काम परिपूर्ण होईल, परंतु सर्व बसेसना रस्त्यावर थांबा न देता स्थानकांच्या आतमधून बस सोडाव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. जेणेकरून प्रवाशांना नव्या शेडचा आधार मिळेल, भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
बस स्थानकाचे काम सुरू असताना एसटी महामंडळाने प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेणे गरजेचे होते. तसेच बस स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत तिथेच तात्पूरच्या स्वरूपाची शेड उभारणे आवश्यक होते. मात्र व्यवस्थापकांनी कोणतीही पर्यायी व्यवस्था प्रवाशांसाठी केलेली दिसून येत नाही. एसटी महामंडळ ऐन मे महिन्याच्या भर उन्हात प्रवाशांना उभे करून चांगलाच घाम काढत आहे. ताटकळत उभे राहून कंटाळलेले प्रवासी काळया- पिवळ्या वडापच्या गाडीने जाणे पसंद करतात. हे चित्र बदलले पाहिजे तरच एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल. उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या मुंबईकरांना स्थानकाच्या कामाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेथील नागरिक व प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी बस भर रस्त्यात उभ्या न करता स्थानकामधून सोडाव्या याबाबत एसटी महामंडळाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागतोय रस्ता
मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-नागपूर या दोन्ही महामार्गाचे काम सुरू आहे. पाली हा परिसर नागरिकांच्या वर्दळीचा भाग आहे. परंतु या भागातील रस्ते खोदलेले असल्याने आधीच धुळीने नागरीक त्रासलेले आहेत. यातच खोदलेल्या रस्त्यामुळे भर दिवसा वाहनचालकांना देखील आपला मार्ग कोणता याची कल्पना येत नाही. तसेच येथील नागरिकांना, प्रवाशांना एसटी बससाठी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या भागात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.