( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या अखत्यारीत असलेल्या महिला मंडळाकडून माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात आज (शुक्रवार, 7 फेब्रुवारी) साजरी करण्यात आली. यावेळी बावीस खेड्यातून एकवटलेल्या महिलांनी माता रमाईच्या त्यागी कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीक्षाभूमी बुद्धविहारात माता रमाईच्या प्रतिमेला ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध विहारातील भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या मुर्त्यांसमोर पुष्प अर्पण तसेच गंध व दीपप्रज्वलन बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे विद्यमान सभापती रजत पवार, बावीस खेडी मुंबई संघटनेचे माजी कोषाध्यक्ष धर्मदास सावंत व महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर धार्मिक पूजापाठ बौद्धाचार्य वैभव पवार व दीपक गमरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली घेण्यात आला.
दरम्यान, माता रमाईच्या जीवन कार्यावर आधारित अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेत उपस्थित महिलांनी आपल्या मनोगतातून आणि माता रमाईच्या जीवनातील खडतर प्रसंगांशी निगडित असलेल्या विविध गीतगायनामधून माता रमाईच्या त्यागी कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य दीपक गमरे यांनी आपल्या मनोगतातून माता रमाईच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले.
शेवटी धम्मपालन व सरणत्तय गाथेने आणि आभार प्रदर्शनाने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. बावीस खेडी बौद्धजन सेवा संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा यांच्या अखत्यारित असलेल्या महिला मंडळाने अत्यंत नेटके नियोजन करून हा कार्यक्रम बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाचे सभापती रजत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून यशस्वीपणे साजरा केल्याबद्दल बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या प्रमुख पदाधिकारी व गाव शाखांच्या प्रमुख प्रतिनिधींकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.