(जाकादेवी / संतोष पवार)
तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय बाबाराव पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात इ.१० वी इ.१२ वी बोर्ड परीक्षेत गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने १२ दिवसीय विशेष अभ्यास शिबीर आयोजित केले असून या शिबीराचे उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हे अभ्यास शिबीर ७ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. उद्घाटन प्रसंगी तरवळ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, शिबीर प्रमुख अमित बोले, संदीप कुराडे, शिक्षक प्रतिनिधी अरुण कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संतोष सनगरे, शिबीर विभागाचे उपप्रमुख अनिल पाटील, राहुल यादव यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता बारावी व दहावी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत अधिकाधिक गुण मिळावेत, तसेच अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांकडे जास्तीत जास्त लक्ष वेधून अधिक गुण मिळण्याच्या दृष्टीने ही शिबीर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.गेली कित्येक वर्ष मालगुंड एज्युकेशन सोसायटीने हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवला आहे आहे. तत्कालीन राज्य पुरस्कार विजेते माजी मुख्याध्यापक कै.सदानंद बळीराम परकर यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दित हा अभिनव उपक्रम राबवून यशस्वी केला होता. आताच्या काळातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हे शिबीर खूपच लाभदायक ठरत असल्याचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी आवर्जून सांगितले. या अभ्यास शिबीरात ३७२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.हे अभ्यास शिबीर जाकादेवी, बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड आणि गुहागर तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे याच कालावधीत सुरू करण्यात आले असल्याचे शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर यांनी सांगितले.