(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील एका शाळेत शिक्षकाने मुलींशी गैरवर्तन केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला होता. याच शाळेतील आणखी एका शिक्षकाचे प्रताप आता समोर आले आहेत. या शिक्षकानेही विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचे पुढे आले आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धडक दिली. मात्र, त्या शिक्षकाने शाळेतून काढता पाय घेतला.
या शिक्षकाचे मेसेज पालकांच्या हाती लागले. याचा जाब विचारण्यासाठी पालक शाळेत धडकले असता, तो शिक्षक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. तर, काही विद्यार्थ्यांनी तो शिक्षक शाळेत असल्याचे सांगितले. यावेळी शहर पोलिसांचे पथकही शाळेत गेले होते. परंतु तो शिक्षक पालकांच्या तावडीत सापडला नाही.
प्रथमेश नवेलेची पोलिस कोठडी रवानगी
या प्रकरणातील सोमवारी अटक करण्यात आलेल्या प्रथमेश नवेले या शिक्षकाला पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.