(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड खोदलेले असून त्यावर आता काही भागात खडी सर्वत्र पसरवून ठेवलेली आहे. पसरवून ठेवलेल्या खडीवरून वाहनचालकांना गाड्या न्याव्या लागत असून रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत आहे. ठेकेदार कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रत्नागिरी हातखंबा या भागात सर्वत्र खोदून ठेवल्यानंतर सर्व्हिस रोड गायब झाले आहेत. चांदसुर्या ते खेडशी, रेल्वे स्टेशन पट्ट्यात सर्व्हिस रोड गायब करून सर्वत्र खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. खडी पसरवुन ठेवलेल्या भागात वाहनचालकांना गाडी चालवताना अक्षशः कसरत करावी लागत आहे. तसेच दुचाकी चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. सर्वत्र पसरवलेल्या खडीवरून मोठी वाहने सुसाट वेगाने मार्गक्रमण करीत असतात यामुळे लहान वाहनांना धोका निर्माण होत आहे. हे काम रवी इन्फ्रा बिल्ड प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येत असून लोकांना वेठीस धरून कंपनी कशापद्धतीनें मनमानी कारभार करत आहे हेच यावरून दिसून येत आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी कोणताही विचार न करता सर्व नियम धाब्यावर बसवले जातात तर दुसऱ्या बाजूने ठेकेदार कंपनीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून शांत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारातून वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याच मार्गावरुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांच्या वाहनांचे ताफे वेगवान धावत असतात. मात्र मंत्री महोदय वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाबाबत चुकार शब्द काढत नसल्याने आच्छर्य व्यक्त केले जात आहे.
खड्डेबंबाळ रस्त्यांमुळे विविध आजार
खड्डेबंबाळ रस्त्यामुळे वाहन चालकांना मान दुखी, कंबर दुखीचे आजार सुरू झाले आहेत, परिणामी वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. एकूणच वाहनचालकांसह प्रवाशांना नाहक त्रास कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. त्यामुळे खड्ड्यात गेलेल्या या रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करावी अशी मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
नियमीत पाणी मारण्यास ठेकेदाराकडून टाळाटाळ
ठेकेदार कंपनीकडून प्रत्येक भागातील रस्ता उखडून ठेवला जात असल्याने प्रचंड धुळीचे लोट उसळत आहे. नियमित पाणी देखील नियमित मारले जात नाही. याच धुळीतून वाहनचालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. एका भागात पाणी मारल्यानंतर दुसऱ्या भागात पाणी मारले जात नाही. धूळ उसळत असलेल्या रस्त्यावर निदान सकाळ, दुपार, रात्री अशा तीन वेळेत नियमित पाणी मारणे आवश्यक आहे. परंतु पाणी मारण्यास ठेकेदार टाळाटाळ करत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. मात्र केंड्याची कातडी असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.