(खेड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाट यादरम्यान इथून पुढे अपघात झाला तर ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षापासून रखडले आहे. त्यातील कशेडी घाट ते परशुराम घाट या दरम्यानचे काम अत्यंत घाईगडबडीत व कोणतेही सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार न करता केले आहे. याच टप्प्यातील सर्विस रोडचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही, डायव्हर्शन देखील चुकीच्या पद्धतीने केले आहे. भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील वक्राकार वळणांमुळे व विचित्र रस्त्याच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरात १५ हून अधिक अपघात झाले असून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
भोस्ते घाटातील अवघड वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. अपघात होऊ नये म्हणून टाकलेल्या मोठ मोठ्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात व्हायला लागले आहेत, भोस्ते घाटाच्या मध्यभागी महामार्गालगत पश्चिमेला दगड आणि मातीसाठी मोठा खड्डा खोदला असून पावसाळ्यात त्यात पाणी साठते व अपघात होतात. इतर वेळी देखील या खड्यांमुळे १५ ते २० ट्रक त्या खड्यात पडून अपघात झाले आहेत.
सर्व परिस्थितीला रस्त्याची विशिष्ठ परिस्थिती अपघातांना कारणीभूत असून वाहनचालकांच्या चुकीमुळे नाही तर रस्त्याच्या चुकीच्या परिस्थितीमुळे अपघात होत असल्याचे पहायला मिळत आहे. अपघात प्रवण क्षेत्राची तज्ज्ञांकडून पाहणी करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच इथुन पुढे अपघात झाल्यास व कोणाचा मृत्यू झाल्यास महामार्ग ठेकेदार आणि महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रुपेश पवार यांनी केली आहे.