(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मधील केंद्रीय राज्यसंरक्षि जलदुर्ग किल्लाला जे.एस.डब्लू पोर्टच्या ड्रेजिंगच्या कंपणामुळे हादरे बसून बुरुजाला तडे गेल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, रत्नागिरी तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी शनिवारी (१७ फेब्रुवारी २०२४) पाहणी करून तसा अहवाल रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना सुपुर्द करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सदर विषयी एका कोणत्याही लोकप्रतिनिधीनी आपले विचार मांडले नाहीत. १९ फेब्रुवारीला महाराजांची शिवजयंती दिवशी, फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी शिवछत्रपतींची आठवण येते. परंतु मोठं मोठ्या कंपन्यांसाठी छत्रपतींचा
ठेवा असणारे गडकिल्ले याकडे मात्र या लोकप्रतिनिधीचे किंबहुना शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही महाराष्ट्र राज्याची अनास्था आह, अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
जयगड किल्ल्याच्या बुरूजाला तडे या आशयाची बातमी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीने प्रशासन घडबडून जागे होऊन तत्काळ तहसीलदार यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी जयगड किल्ल्याची पाहणी केल्याबद्दल ग्रामपंचायत जयगडच्या सदस्या सौ देवियनी देविदास खाडे यांनी त्यांचे आभार देखील मानले आहेत.
दरम्यान यावेळी त्यांनी एक खंत ही व्यक्त केली की, जर तहसीलदारांसह आम्हा ग्रामस्थांना आणि पुरातत्व खात्याचे तैनात कर्मचारी यांना सोबत घेऊन जर जयगड किल्ल्याच्या भेटी संदर्भात सूचना दिली असती, तर कदाचित त्यांना मुख्य बुरुजाला तडे कुठून गेले आहेत ते चांगल्या प्रकारे दाखवता आले असते. तहसीलदार म्हात्रे यांनी किल्ल्याची पाहणी केली. मात्र तडे गेलेली धोकादायक जागा पाहायचे राहून गेलं, असे सांगण्यात येत आहे.
तहसिलदार म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केल्यानंतर या विषयी जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेणार? याकडे जयगड ग्रामस्थांसहीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.