(राजापूर)
तालुक्यातील हातिवले येथे १५ टन शिंपल्याच्या कचची बेकायदेशीर वाहतूक करणारा एकाला टेम्पोसह ताब्यात घेतले. या कारवाईत दीड लाखांची कच आणि टेम्पो असा साडेअकरा लाखाचा मुद्देमाल राजापूर पोलिसांनी जप्त केला असून कागल (जि. कोल्हापूर) येथील एका संशयिताला ताब्यात घेतले.
दत्ता बाळासाहेब राऊत (वय ४३, रा. बिरदेव वसाहत, कागल, जि. कोल्हापूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. राजापूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. साखर कोंभे या ठिकाणाहून शिंपल्यांची कच भरलेला एक टेम्पो विनापरवाना वाहतूक करत आहे, अशी गोपनीय माहिती राजापूर पोलिस ठाण्यात काम करणारे अंमलदार सचिन वीर यांना मिळाली. प्रभारी निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना याबाबत सांगितले. त्यांनी राजापूर पोलिस ठाणे हद्दीमधील हातिवले येथे या टेम्पोला पकडण्यासाठी पथक नेमले. हातिवले येथील मुंबई- गोवा महामार्गावर हे पथक गस्त घालत होते. तेव्हा रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान हातिवले, जोशी पेट्रोलपंप समोरील महामार्गावर एक लाल रंगाचा टेम्पो येत असताना दिसला. संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबविला.
तपासणीत टेम्पोच्या हौदामध्ये शिंपल्यांचा कच भरलेला दिसला. टेम्पो चालकाकडे मालाबाबत कोणताही खरेदी अगर वाहतुकीचा परवाना नव्हता. टेम्पो चालक दत्ता राऊत याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलिस नाईक सचिन वीर, हवालदार पंकज साटविलकर, अनिल केसकर व अर्शद मुल्ला, या पथकाने ही कारवाई केली