(रत्नागिरी)
रत्नागिरी वनविभागातर्फे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दापोली तालुक्यात कात उद्योगावर धडक कारवाई करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिक्षेत्रामध्ये शिवणे येथील शासकीय जमिनीमध्ये खैराची वृक्षतोड करून ते संपूर्ण लाकूड रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असणाऱ्या कात उद्योगावर नेले जात होते. याची माहिती रत्नागिरी वनविभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तसेच या अगोदर वनविभाग सोलापूरमधील सांगोला परिक्षेत्रातील मौजे शिवणे हद्दीतील शासकीय वनक्षेत्रात खैर जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड आढळून आली. त्याअनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला यांनी गुन्हा नोंद केला आहे. अवैध वृक्षतोडीबाबत नोंद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाअंतर्गत आढळून आलेल्या दत्तात्रय शि. गोडसे व मारूती वि. गळवे या संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता शासकीय वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीमधील खैर लाकूड माल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे विसापूर येथील गुरुकृपा कात उद्योग येथे आणला असल्याची माहिती निष्पन्न झाली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने रत्नागिरी वनविभागातील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्याशी संपर्क साधुन परिक्षेत्र वनअधिकारी सांगोला व परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी संयुक्त कारवाई केली. गुरुकृपा कातउद्योगातील आढळून आलेला खैर लाकूड माल सांगोला वनपरिक्षेत्रातील असल्याची खात्री करून गुरुकृपा कात उद्योग विसापूर येथील उपलब्ध खैर लाकुड माल जप्ती करून खैर जातीच्या लाकडाचे ३०१ नग जप्त करण्यात आले आहेत.
परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला यांच्याकडील नमूद तक्रारीच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील कलम ५३ अन्वये दिनांक २९.०५.२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. नोंद गुन्ह्याच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांचे मार्फत पुढील तपास कामी गुरुकृपा कातउद्योग व परिसराची कसून पाहणी केली असता. तेथे खैर असोलिव किटा १०.९०० घ.मी. व खैर सोलिब किटा ४.६०० घ.मी. तसेच मनाई बिगर मनाई जळावू किटा- ३.७० घ.मी. तसेच प्रक्रिया करून बनविलेला तयार कात रस प्रत्येकी ४० किलो याप्रमाणे एकूण ९३ बॅरलमध्ये आढळून आला. आढळून आलेला सर्व माल परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी जप्त करून गुरूकृपा कात उद्योग या कारखान्याला सिल करण्यात आले आहे. याबाबत परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्या मार्फत पुढील तपास सुरू आहे.
मौजे विसापुर ता. दापोली येथील कातउद्योगावर कारवाई प्रकरणी गिरीजा देसाई विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे सहा. वनसंरक्षक वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली श्री.टी. व्ही. जाधव, परिक्षेत्र वनअधिकारी सांगोला, श्री.पी.जी. पाटील. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, श्री. वरकटे व श्री. कवटले. वनरक्षक सोलापूर वनविभाग तसेच श्री. सावंत वनपाल दापोली, श्री. दळवी, वनपाल मंडणगड, श्री. जलने वनरक्षक, वनमजुर श्री. गोडर यांनी कार्यवाही पार पाडली.