(संगमेश्वर / एजाज पटेल)
अतिज्वलनशील पदार्थ असणाऱ्या पेट्रोल किंवा डिझेलची विक्री पंपाबाहेर केली जात असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो. असे असताना संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावात पेट्रोल आणि डिझेलची अशी खुलेआम विक्री चक्क दुकान आणि छोट्या मोठ्या टपऱ्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठी असलेले नियम या तालुक्याला लागू होत नाही काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
संगमेश्वर तालुक्यातील काही गावांत मिनी पेट्रोलपंप फोफावले असून, वाहनधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गावोगावी पान टपऱ्या, किराणा दुकान, कोल्ड्रिंक्स दुकाने या ठिकाणी सर्रासपणे पेट्रोलची अवैध विक्री होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये शहराबरोबरच खेड्यापाड्यातही दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फायदा घेत गावातील पानटपऱ्या आणि अन्य खाद्यपदार्थ दुकानदारांनी घेतला असून त्यांच्याकडून पेट्रोलचा मोठा साठा करून ठेवला जातो. व लिटर मागे पंधरा ते वीस रुपये जादा आकारून गरजूंना विकत दिले जाते. रस्त्यात पेट्रोल संपल्याने व जवळपास पेट्रोलपंप नसल्याने अडलेल्या गरजूना नाईलाजास्तव जादा दराने पेट्रोल खरेदी करणे भाग पडते.
पेट्रोल तसेच डिझेल हे अतिज्वलन पदार्थ असल्याने ते पेट्रोलपंपाशिवाय खासगीत बाळगणे तसेच दुकानांवर विक्री करणे कायदेशीर गुन्हा असताना, हे विक्रेते मोठ्या कॅनमध्ये पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून आणून साठा करतात व खुलेआम विक्री करतात. तर नियमाने पेट्रोलपंपावर कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई असतानाही पेट्रोल कसे काय दिले जाते, हा प्रकार गंभीर असून त्यातून एखादेवेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याला वेळीच आवर घालण्याची मागणी करण्यात येत असून सबंधित विभाग एखादी दुर्घटना होण्यापूर्वी याची त्वरित गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा हाती घेऊन कारवाई करणार का? हे पहावे लागणार आहे.