(संगमेश्वर)
श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. पुढे मार्गदर्शन करताना,येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा असे आवाहन मुझम्मील काझी यांनी केले आहे.
पुढे आपल्या भाषणात सांगितले की,जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा आहे त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मंचावरून मुझम्मील काझी यांनी सांगितले की, आजची पिढी ही खूप भाग्यवान आहे. आजच्या पिढीला सगळं आयत मिळालं आहे. कोणते कष्ट करायचे नाहीत किंवा ना अजून काही. पण येणाऱ्या पिढीला मात्र खूप संघर्ष करावा लागणार आहे. आज आपल्या गावात,आपल्या भागात आपणच परके होत चाललो आहोत, परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकून मोकळे झालोत. आज अर्ध कोकण हे आपणच विकून टाकलेले आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे.
पुढे उदाहरण देताना मुझम्मील काझी यांनी म्हटले की, मागेच एक लोकसत्ताला बातमी वाचली होती.साखरपा जवळचे ओझर गाव हे तिथल्या ग्रामस्थांनी विकायला काढले आहे. तब्बल साडेचार हजार एकर जागा विकण्याची पेपरला जाहिरात दिली होती. विचार करा किती गंभीर परिस्थिती आहे. आज त्या गावात तरुण मुलेच नाहीत. फक्त वयोवृद्ध माणसे आहेत. गावात एसटी येत नाही. मोबाईलला नेटवर्क नाही. गावाकडे लक्ष द्यायला कोणी नाही. किती भयानक परिस्थिती असेल. आज आपली गावे ओस पडत चालली आहेत.
आपणच आपली मानसिकता बनवून घेतली आहे. मुलाला मुंबईला नोकरी पाहिजे.दहावी बारावी झाली की बॅग भरून मुंबई गाठायची.कोकणातले सुखी जीवन सोडून धकाधकीच्या जीवनात जायचे. आपण ठरवलं आहे की,मुलगा मुंबईला असेल तरच मुलगी देणार. मुंबईला नोकरी पाहिजे तरच लग्न करणार भलेही मुलगा तिथे लोकलचे धक्के खाऊ देत. पण इथला शेतकरी नवरा नको.
आज जर आपण आपल्या गावात राहून उद्योग सुरू केले तर बाहेर नोकरी करण्याचीही गरज नाही. आपला ग्रामीण भाग निसर्ग संपन्न आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे.त्याचा आपण कधी वापर करणार. पर्यावरणपूरक उद्योग धंदे सुरू करून आपण रोजगार निर्माण केला पाहिजे. अजून किती दिवस दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार आहोत.आपणही दुसऱ्यांना रोजगार देणारे बनले पाहिजे.
मुझम्मील काझी यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की, आज आपल्या गावाला तरुणांची गरज आहे.इथे तरुण राहिले पाहिजेत.तरच गावाचा विकास करता येईल.
पुढे,श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले, आज 25 वर्षे पूर्ण झालीत,येणारी 2500 वर्षे हे मंडळ येणाऱ्या पिढीला आदर्शवत ठरू दे. मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. शासनाच्या सर्व योजनांचा पुरेपूर लाभ घेणारे हे मंडळ आहे.
मंडळाच्या वतीने सन्मान
पत्रकार मुझम्मील काझी यांच्या श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.यावेळी त्यांना मंडळाचे अनिल चंदरकर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक लिंगायत,परचुरी गावच्या सरपंच शर्वरीताई वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंदरकर, माजी उपसभापती पंचायत समिती परशुराम वेल्ये, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत शिंदे,पोलिस पाटील सुधीर लिंगायत, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते वहिद राजापकर, उक्षी गावचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मेस्त्री, मंडळाचे संजय चंदरकर,डॉ.विनायक पेठे, डॉ.चंद्रकांत लिंगायत, गीतकार मधुकर यादव,शाहीर प्रकाश पंजने,उदय चिबडे, सदाशिव धांगडे, संदेश दुदम व तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.