(रत्नागिरी)
वक्तृत्व म्हणजे पोपटपंची नाही, पाठांतर नाही, तर ही एक कला आहे. त्याला विचारांची जोड हवी. शब्दांचा अर्थ समजणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी वाचन हवे. वाचा पण नक्कल करू नका. स्वतः चे मत मांडा. मूळ विचारांची बैठक असेल, तर वक्तृत्व जीवन बदलते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक ज्ञानेश महाराव यांनी केले.
येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये ४२व्या कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, परीक्षक योगेश कदम, प्रा. प्रकाश पालांडे, डॉ. शंकर जाधव, गणपत शिर्के, प्रा. राजरत्न दवणे, सिद्धेश मिसाळ, स्पर्धा संयोजक प्रा. सचिन टेकाळे, अभिनेते मयुरेश कोतकर उपस्थित होते.
महाराव म्हणाले की, हृदयातून येते ती भावना आणि मेंदूतून येते ती बुद्धी. आपल्या वक्तृत्वातून बुद्धीची चमक आणि भावनेचा ओलावा दिसला पाहिजे. वक्तृत्व हे श्रवणीय असले पाहिजे, सहज सुलभ असले पाहिजे, याचीही काळजी घेतली पाहिजे. कला माणसाला उन्नत करते, व्यापक करते म्हणूनच ती त्याप्रकारे विकसित करायला हवी. स्वतःला ओळखणे ही सुद्धा कलाच आहे आणि ती प्रसंगानुरूप येते. ते प्रसंग आयुष्यात आले पाहिजेत आणि आपण ते ओळखले पाहिजेत.
अभिजीत हेगशेट्ये म्हणाले की, आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते पाहण्यासाठी संवेदना जाग्या असल्या पाहिजेत. वक्तृत्व प्रभावीपणे मांडण्यासाठी शब्दांचे सामर्थ्य, वापर समजला पाहिजे. ही स्पर्धा उद्याच्या महाराष्ट्राला एक ताकदीचा नेता देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.