( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
तालुक्यातील कडवई पंचक्रोशी मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे पालक व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात शिवाजी माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दीपक लिंगायत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना लिंगायत सर म्हणाले की स्वतःची प्रगती करायची असेल तर स्वतःमधील कण आणि कण ओळखता आला पाहिजे.आजच्या पिढीतील अनेकांना उच्च शिक्षण घेऊनही नेमकं काय करायचं ते कळत नाही यासाठी स्वतःची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे.मोठी माणसे मोठी कशी झाली हे जाणून घेण्यासाठी वाचलं पाहिजे.यशस्वी लोकांची चरित्रे प्रेरणा देतात.पालकांनी मुलांना मोबाईल,घड्याळ,कपडे यापेक्षा चार चांगली पुस्तके घेऊन दिली पाहिजेत.घरातले टीव्ही,फ्रिज,वॉशिंग मशीन ही खरी संपत्ती नाही तर कपाटांनी भरलेली पुस्तके खरी संपत्ती आहे.मुलांशी वागताना,बोलताना पालकांनी विचारपूर्वक वागावे.सिरीयल व चित्रपट पाहताना त्यांचे मुलावर दुष्परिणाम होणार नाहीत ना याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.आज आपल्याला मोबाईल व कॉम्प्युटरचे कौतुक वाटते पण निसर्गाने आपल्याला बुद्धिरूपी कॉम्प्युटर दिलाय त्याचा विसर पडतो त्याचा सदुपयोग करा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी अडवू शकत नाही.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वसंत उजगावकर, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे,पर्यवेक्षक संतोष साळुंके व मोठया संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद कडवईकर यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत किंजळकर, समीर भालेकर, सोमनाथ कोष्टी,तानाजी दोरखडे,भाग्यदेवी सावंत,नयना गुजर,शुभम शिंदे,प्रशांत साळवी,अरविंद सुर्वे यांनी मेहनत घेतली