(चिपळूण)
तुमचे हे प्रेम पाहून मला खरोखरच येथे काम केल्याचा आनंद होत आहे. तुमच्या या प्रेमाची शिदोरी मी कायम बरोबर ठेवीन, असे भावनिक उद्गार मावळते मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काढले. नागरिकांनी व्यक्त केलेले प्रेम पाहून त्यांना कार्यक्रमात भारावून आले. त्यामुळे मनोगत व्यक्त करताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. तर दुसरीकडे नगर परिषदेची महानगरपालिका झाल्यावर आयुक्त म्हणून पुन्हा या अशी साद नागरिकांनी शिंगटे यांना घातली.
गेली २ वर्षे ५ महिने येथे मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या शिंगटे यांनी वसई-विरार महानगरपालिकेच्या सहआयुक्तपदी बदली झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी नगर परिषद अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना शिंगटे म्हणाले की, तुमच्या शुभेच्छारूपी प्रेमाला मी कायम स्मरणात ठेवीन. कोठेही काम करताना तुमची ही शिंदोरी मला अंत्यत महत्वाची ठरणार आहे. आजचे प्रेम पाहून माझे डोळे आणि उरही भरून आला आहे. जर कधी मनात स्थायिक होण्याचा विचार आला तर त्यासाठी मी चिपळूण निवडेन असेही शिंगटे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, चिपळूणकरांचे प्रेम पाहून आज माणूस म्हणून मोठा झालो आहे. इथे काम करतांना अनेक गोष्टींना सामोरा गेलो. त्यामुळे आज मी समृद्धही झालो आहे. माझा लोकशाहीवर दृढ आणि प्रचंड विश्वास आहे. म्हणून हे मी आज करू शकलो. एकटा असल्यावर जलद गतीने पुढे जाता येते, असे म्हणतात. पण दूरवर जायचे असेल तर पदाधिकारी सोबत असावेच लागतात. त्यामुळे कायमस्वरूपी प्रशासक असणं धोकादायक असणं हे शहरासाठीही धोकादायक असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
ही यशाची पावती आहे – आ. शेखर निकम
यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी शिंगटे यांचा स्वभाव चांगला असल्याने व त्यांच्यात सर्वांना विश्वासात घेण्याचा गुण असल्याने त्यांना येथे प्रभावी काम करता आले आहे. आजची उपस्थिती ही त्यांच्या यशाची पोचपावती आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सुचय रेडीज, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, लियाकत शाह, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातु बिलाल पालकर मिलींद कापडी, विजय चितळे, महंमद फकीर, करामत मिठागरी, रमेश खळे, शिरीष काटकर, श्रीराम शिंदे, उदय ओतारी, दशरथ दाभोळकर, मिनल ओक, आर्किटेक्ट दिलीप देसाई, बळीराम मोरे, माजी नगरसेविका स्वाती दांडकर, आदिती देशपांडे, लेखिका सरोज नेने, क्रेडाईचे राजेश वाजे, जावेद दलवाई, भाऊ कार्ले, सुमती जांभेकर, बाबू तांबे, उद्योजक नासिर खोत, उस्मान बांगी, राजू जाधव, निहार कोवळे, उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, नगरं अभियंता प्रणोल खताळ, अभियंता नागेश पेठे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, राजेंद्र खातू आदी उपस्थित होते.