(सांगली)
सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, १ कोटी रुपयांच्या विम्याच्या पैशासाठी पत्नीने आपला मुलगा आणि एका जोडीदारासह पतीची हत्या केली आहे. याप्रकरणी आई आणि मुलाला दोघांनाही पतीच्या मृत्यूला अपघात म्हणून दाखवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख वनिता बाबुराव पाटील, तिचा मुलगा तेजस बाबुराव पाटील आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान अशी झाली आहे. त्यांना पोलिसांनी १ मार्च रोजी सांगली येथून अटक केली आहे. प्रथम आई आणि तिच्या मुलाने कर्जबाजारी शेतकरी असलेल्या बाबुराव पाटील (५६) यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले होते. जेव्हा ते सहमत झाले नाही तेव्हा त्यांनी त्याला जीवे मारले. १० फेब्रुवारी रोजी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान मिरज-पंढरपूर महामार्गावरील लांडेवाडीजवळ ही हत्या घडली होती.
बाबुराव पाटील यांचा मृतदेह हॉटेल आर्याजवळ आढळला होता. त्यांचा भाऊ सागर पाटील यांनी त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेले, जिथे सुरुवातीला हा अपघात असल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु आई आणि मुलाच्या जबाबावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन शोधून काढले. घटनेच्या दिवशी ते कराडमध्ये असल्याचे दोघांनीही पोलिसांना सांगितले होते परंतु मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी पत्नीने पतीवर झालेल्या कर्जाचा डोंगर आणि कर्ज फेडण्यासाठी सातत्याने येत असलेल्या दबावाला कंटाळून तसेच पतीच्या विम्याचे पैसे त्याच्या मृत्यूनंतर आपल्याला मिळावेत या हेतूने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी या महिलेने स्वत:चा मुलगा आणि त्याच्या मित्रांना मदतीला घेतल्याचे तपासामधून समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बाबुराव पाटील हे कर्जबाजारी झालेले होते. तसेच त्यांना कर्ज देणारी मंडळी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होती. मात्र बाबुराव पाटील यांच्याकडे काही विमा पॉलिसी होत्या. या पॉलिसींचे पैसे मिळवण्यासाठी बाबुराव पाटील यांची हत्या करून त्यांच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा डाव त्यांच्या पत्नीने आखला. बाबुराव पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला, असे भासवण्यासाठी आरोपींनी रस्त्याच्या दुभाजकावर डोकं आपटून त्यांची हत्या केली.
दरम्यान, पोलिसांनीही सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र पोलिसांना बाबुराव पाटील यांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक तपास केला. तसेच मुलगा तेजस पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मृत बाबुराव पाटील यांची पत्नी वनिता पाटील आणि तेजस पाटील याचा मित्र भीमराव हुलवान यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांनीही आपण बाबुराव पाटील यांची दुभाजकावर डोकं आपटून हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिस चौकशीदरम्यान आई आणि मुलाने दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी सांगितले की पाटील यांच्यावर सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज होते, त्यामुळे लोक त्यांच्या घरी नियमितपणे पैसे मागण्यासाठी येत असत आणि जेव्हा बँकेकडून घर लिलावाची नोटीस येत असे. तेव्हा त्यांनी बाबुराव पाटील यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला.तेव्हा पत्नी आणि मुलाने एका साथीदारासह पतीच्या हत्येचा कट रचला.