(सावंतवाडी)
आंबोली येथे वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी बंदूक परवाना असलेल्या बांदा येथील आणखी एकावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ आगा (४०) असे त्याचे नाव आहे. त्याला नोटीस बजावण्यात आली आहे तर अटकेत असलेल्या सहा जणांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना जामीन नामंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
फरान समीर राजगुरू (२६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (४२), बाबुराव बाळकृष्ण तेली (४२), सर्फराज बाबर खान (३४), रजा गुलजार खान (२३), अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या शेतीसंरक्षक बंदुक परवाण्यातील बंदुकांचा शिकारीसारख्या अवैध कृत्यांसाठी गैरवापर करणाऱ्यांवर वन विभामार्फत तसेच पोलिस विभागाची मदत घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले.
तसेच कुणी बंदुकांचा शिकारीसाठी असा गैरवापर करत असल्यास त्याबाबत बातमी देऊन वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी एस नवकिशोर रेड्डी, विभागीय वन अधिकारी कोल्हापूर दिलीप भुरके, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, वनक्षेत्रपाल आंबोली सौ. विद्या घोडके, फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल सौ. पूनम घाटगे, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, पांडु गाडेकर आदींनी केली.