( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील काही दिवसांपूर्वी एक डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत बॉडीवर वार्डमध्ये तपासणीसाठी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर शनिवारी (दिनांक ३१ ऑगस्ट २०२४) सकाळी पुन्हा एक रुग्णालयातील कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत डॉ. सांगवीकर यांना सापडला. याबाबत या कर्मचाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रुग्णालयात रात्रीच्या तपासणीच्या राऊंडला येणाऱ्या डॉक्टराचे प्रताप समोर आल्यानंतर आता एका कर्मचाऱ्यांचा देखील कारनामा उघड डॉक्टरांनी पाहिला आहे. व्यसनी पेशंट या रुग्णालयातून अगदी चांगले बरे होऊन घरी जातात. मात्र रुग्णालयातील कर्मचारी देखील व्यसनाधीन होतायत की काय? असा प्रश्नच घडलेल्या घटनांमधून उपस्थित होत आहे. या रुग्णालयात घडत असल्याने रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत आहे. डॉक्टर विनोद सांगविकर यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी रुग्णालयाला लाभले आहेत. डॉक्टर सांगविकर हे रुग्णालयात चोवीस तास ठाण मांडून आवारात दिसतात. त्यांच्याच माध्यमातून रुग्णालयाचा कारभार हळूहळू सुधारत असल्याचे चित्र आहे. मात्र अशा नगण्य घटनांमुळे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन होत आहे.
काल सकाळी आठ वाजता रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद सांगविकर यांचा तपासणीचा राऊंड चालू होता. डॉ. सांगविकर यांच्यासह इतर डॉक्टर सुरक्षा रक्षक असे पाच ते सहा जणांची टीम राऊंडसाठी फिरत होते. प्रत्येक वार्डमध्ये फिरत असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मेल सर्जिकल वार्डमधील कर्मचारी मिलींद चव्हाण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. चव्हाण हा या वॉर्डमध्ये ड्युटीकरीता असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद सांगविकर यांनी त्याला विचारले. यावेळी मिलिंद चव्हाण याने थेट डॉक्टरांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच उध्दटपणे बोलु लागला. हा सर्व प्रताप पाहून डॉक्टरांनी त्याला शांत राहण्यास सांगितले.
या कर्मचाऱ्याला ड्युटीवर दारु पिवुन येऊ नकोस असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र तोंडी सांगुन देखील तो दारु पिवुन येऊन आरडा ओरडा करत होता. या कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर अल्कोहोलचे सेवन केल्याचे आढळून आले. तसेच त्याचा रक्त नमुना तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या घडलेल्या प्रकारावरून चव्हाण ह्या कर्मचाऱ्यावर शहर पोलिस ठाण्यात कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 प्रमाणे कलम ७५(१), ७५(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कलम ११०,११७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.