(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पहिल्याच पावसाच्या दणक्यात मिऱ्या-नागपूर महामार्गाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी आहे. खेडशी भागात काल रात्रीपासून पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. याठिकाणी दिड फुटापर्यंत पाणी साचून राहिले आहे. संबधित विभागाचे या भागात पूर्णतः दुर्लक्ष होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
खेडशी भागात चौपदरीकरणाच्या मार्गिकेचे काम अर्धवट स्थितीत आहे. रवी इन्फ्राबिल्ड या ठेकेदार कंपनीचा भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. गेल्या तीन ते चार दिवस पावसाची संततधार कायम असल्याने काल रात्रीच्या सुमारास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यातून दुचाकी चालकांना अक्षशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला. परंतु पाण्याचा निचरा होण्याबाबत रात्रीपासून सकाळपर्यंत प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेलीं दिसून येत नाही. यामुळे वाहनचालकांमधून संतप्त प्रतिक्रया उमटत आहे.
आज गुरुवारी (दिनांक २७ जून २०२४) देखील रस्त्यावर प्रंचड पाणी साचून राहिले आहे. येथील दोन्ही बाजूंची गटारे देखील चिखलाने तुंबली आहेत. निर्माण झालेली समस्या दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्णतः रस्ता पाण्याने भरून जाईल. तसेच दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प होण्याची शक्यता आहे. सकाळीच ठेकेदार कंपनीचा घटनास्थळी जेसीबी दाखल झाला आहे. मात्र पाणी कमी झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही तर दुसरीकडे पावसाने जोर धरला आहे अशा दुहेरी कोंडीत ठेकेदार सापडला आहे.
या ठिकाणचा खोलगट भाग लक्षात घेता पाऊस कमी असताना लेनचे काम पूर्ण करून घेणे गरजेचे होतें मात्र ठेकेदार कंपनीने वेळोवेळी दुर्लक्ष केले. थोडे पाणी साचल्यावर ठेकेदार जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर खडीचा मारा करून चिखल तात्पुरता दबून जात असे, काही वेळाने जोराचा पाऊस कोसळल्यानंतर परिस्थिती जैसे थे होत असल्याने केलेल्या उपाययोजनांचा काय फायदा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे वाहनचालकांना पाण्यातून जाण्याची स्थिती ओढवली आहे. या समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.